फलटण टुडे वृत्तसेवा : –
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शासकीय निर्णयानुसारची मासिक अर्थसहाय्यातील रु.9 हजार ची वाढ पुढील महिन्यापासून देण्यात येईल; हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन अभिनंदनीय असून सन्माननिधीची ही वाढीव रक्कम फरकासह मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना महाराष्ट्र शासनाकडून आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी अंतर्गत दरमहा रु.11 हजार चे वितरण केले जाते. या सन्माननिधीमध्ये वाढ होण्याची मागणी सातत्याने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने केली होती. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथेप्रमाणे मंत्रालय वार्ताहर संघात येऊन उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी यापूर्वी घोषित पत्रकार सन्मान निधीची वाढीव रक्कम रु. 9 हजार पुढील महिन्यापासून देण्याचे सुतोवाच केले आहेत. तथापि, तत्कालिन मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना’ अंतर्गत ज्येठ पत्रकारांना द्यावयाचे मासिक अर्थसहाय्य रुपये 11 हजार वरुन रुपये 20 हजार इतके करण्याबाबत दि.14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक मावज-2023/प्र.क्र.226/कार्या-34 नुसार घोषित केले होते. त्यामुळे ज्याप्रमाणे सरकारी कर्मचार्यांना भत्ते अन्य वेतनवाढी अदा होताना प्रत्यक्ष घोषणेच्या तारखेपासून अदा होत असते त्याप्रमाणे सदर ज्येष्ठ पत्रकार सन्माननिधीतील ही रु. 9 हजार ची वाढ देताना ती दि. 14 मार्च 2024 पासूनच्या फरकासह पुढील महिन्यापासून देण्यात यावी, अशी मागणी रविंद्र बेडकिहाळ यांनी केली आहे.
या मागणी निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तथा ना. एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आली आहे.