फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी):-
म.ए.सो.पूर्व प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी प्रमुख अतिथी बारामतीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अश्विनकुमार वाघमोडे यांच्या उपस्थितीत व शाला समितीचे अध्यक्ष मा.अजय पुरोहित सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी शाळेचे स्थानिक समन्वयक पी.बी. कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिताताई, प्राथ. विभागाच्या मुख्या. खेडलेकर स्नेहसंमेलन प्रमुख चित्रा फडतरे, प्रतिभा कदम उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका तावरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा, यशाचा व शाळेत होणारे कार्यक्रम उपक्रम याचा आढावा घेऊन अहवाल वाचन केले. विविध स्पर्धेतील मुलांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. विशेष पुरस्काराने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
चित्रा फडतरे – आदर्श शिक्षिका,
अर्चना कुरटकर – अष्टपैलू शिक्षिका, रणजीत घाडगे – उत्कृष्ट लेखनिक, प्रयागा गानबोटे – कामसु सेविका या पुरस्कारानी गौरविण्यात आले. यामध्ये पालकांसाठी व शिक्षकांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“वसुधैव कुटुंबकम” विविधतेतून एकता या विषयावर स्नेहसंमेलन सादरीकरण घेण्यात आले.
भविष्याकडे पाहताना त्यात ध्येय असावे लागते. गरज ही शोधाची जननी असून निर निराळे ध्येय उराशी बाळगून त्याचबरोबर मुलांचा आहार व त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचवण्याकरता काही सवयी लावणे गरजेचे आहे . कारण मुले अनुकरण शील असतात. त्याकरिता पालकांनी मुलांसाठी स्वतः मध्ये आधी बदल करणे खूप गरजेचे आहे, आहारात बदल करणे गरजेचे आहे.असे आवाहन विद्यार्थ्यांना व पालकांना प्रमुख पाहुणे डॉ.वाघमोडे यांनी केले. मुलांच्या या वयात त्यांच्यावरील संस्कार शिस्त अंगी बाळगण्याकरता पालकांनी सजग राहून त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले पाहिजे म्हणजेच मुलांच्या संगोपनात खूप हट्टीपणा अगर खूप त्यांना मोकळेपणा न देता त्यांना हवा तेवढा वेळ देऊन त्यांचे संगोपन लक्ष देऊन केले पाहिजे व पालक आणि मूल यांच्यात उत्तम समन्वय असला पाहिजे
असे आवाहन अध्यक्षीय भाषणांमध्ये मा.अजय पुरोहित सर यांनी केले. त्यानंतर शाळेच्या यंदाचा “वसुधैव कुटुंबकम” विविधतेतून एकता या उपक्रमाला अनुसरून हा विषय घेऊन खेळवाडी ते मोठ्या गटातील शाळेतील सर्व मुलांनी अतिशय उत्तम रित्या, उत्साह पूर्ण वातावरणात ,पारंपारिक वेशात, नाटुकल्यासह कार्यक्रम सादर केले.
शाला समितीचे अध्यक्ष मा.अजय पुरोहित सर, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, मुख्याध्यापिका अनिताताईं यांचे बहुमोल व प्रेरणादायी मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कुलकर्णी यांनी केले तर आभार संमेलनाच्या संमेलन प्रमुख चित्रा फडतरे यांनी मानले.