फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.०६):-
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 च्या अखेर पर्यंत 80,000 शेतकऱ्यांची भेट नोंदविण्यात आली. कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटिल व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. सदरील कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि संबधित कंपन्या, शेती व्यवसायाला लागणाऱ्या कृषि निविष्ठा, शेती यांत्रिकीकरण, महिला बचत गट उद्योग, गांडूळखत निर्मिती, हातमाग व घर उद्योग, चर्मकार उद्योग, लोणचे व्यवसाय, विविध कुटिर उद्योग व कृषि विषयक विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला यामध्ये प्रामुख्याने ऍपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ संपूर्ण शेतमाल विकला गेला तसेच तालुक्यातील महिला बचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून श्री. अजिनाथ पवार, मौजे वाघोशी, यांचा चार पायाचा कोंबडा, श्री. मनोज कदम, मौजे गिरवी यांचा खिलार जातीचा काझळ बैलजोडी, श्री. धीरज ढेंबरे, मौजे वडजल यांचा खिलार जातीचा चंदर बैल, महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे फळाचे गाव धुमाळवाडी आकर्षण, के बी कंपनीचा आधुनिक कृषि तंत्रज्ञान, उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले. तसेच विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, शेती यंत्र व अवजारे, मोटार गाड्या, शेती तंत्र यांची बहुसंख्य प्रमाणात शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांनी विक्री करण्यात आली. प्रदर्शनाच्या अखेर पर्यंत फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य 70,000 ते 80,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कृषि प्रदर्शनाला भेट दिली व श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले. शब्द संकलन व शब्दांकन – प्रा. एन. एस. धालपे व डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले.