जानाई ते शिरसाई या उपक्रमात सहभागी झालेले लहान मुले
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती) :-
बाल वयात निसर्गाची आवड निर्माण व्हावी, निसर्गातील प्रत्येक घटनांच्या शंकाच निरसन व्हावं, पर्यावरण वाचवा ,पाणी वाचवा आदी संदेश देत जानाई ते शिरसाई अर्थात कटफळ ते शिर्सुफळ निसर्गातून पायी प्रवास कार्यक्रम संपन्न झाला.
बारामती ट्रेकर्स क्लब यांच्या वतीने १२ जानेवारी रोजी जानाई ते शिरसाई
(कटफळ ते शिर्सुफळ) हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बारामती ट्रेकर्स क्लबचे भारत मोकाशी, हरीश कुंभारकर, दादासाहेब चौधर, अँड सचिन वाघ, दिलीप भापकर, विशाल आटोळे व सदस्य,विविध क्षेत्रातील भ्रमंती करणारे तज्ञ,विद्यार्थी सहभागी झाले होते.
ग्रामदेवता जानाई व ग्रामदेवता शिरसाई देवीची कथा व मंदिराचा इतिहास त्याचप्रमाणे प्रत्येक जमिनीची माहिती व त्यावरील विविध पिके, विविध वृक्ष व प्राण्यां मध्ये
हरिण, ससे, मुंगूस व जलचर मध्ये मासे ,खेकडा, झिंका व पक्षांमध्ये कबूतर,चिमणी, मोर, लांडूर आदीं दाखवून त्यांचे निसर्गामध्ये असलेले योगदान ची माहिती देण्यात आली.
अत्याधुनिक युगात शहराकडे धाव घेत असताना शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक होतात परंतु ग्रामीण भागातील संस्कृती निसर्गची माहिती विद्यार्थ्यांना होणे नितांत गरज आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे एसटी महामंडळ चे पुणे विभाग कामगार अधिकारी ऍड सचिन भुजबळ यांनी सांगितले.
लहान मुलांनी बैलगाडी मध्ये बसून सदर उपक्रमाचा आनंद घेतला.
सदर उपक्रमात सहभागी झालेल्यांना ऊस, आवळा, चिंच, बोरे देऊन सन्मानित करण्यात आले.