
फलटण टुडे वृत्तसेवा :-
कुष्ठरोग हा इतर आजारांसारखा एक सर्वसाधारण आजार असून त्यावर सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये तपासणीची व प्रभावी औषधोपचाराची सोय मोफत उपलब्ध आहे, मात्र या आजारा विषयी समाजामध्ये असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज व भितीमुळे कुष्ठरोगाची संशयित लक्षणे असणाऱ्या व्यक्ती तपासणीसाठी स्वतःहून पुढे येत नाही. यासाठी सहायक संचालक, आरोग्य सेवा कार्यालयाकडून कुष्ठरोग शोध मोहिम जिल्ह्यात 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
“स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५” मध्ये कुष्ठरुग्णांशी भेदभाव करु नये या आशयाचे जिल्हाधिकारी, सातारा यांचे आवाहनाचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती देण्यात येणार आहे.
कुष्ठरोग हा संथ गतीने वाढणारा आजार आहे. कुष्ठरोगाची संशयित लक्षणे म्हणजे, हातापायाला मुंग्या येणे / हाता पायातील ताकद कमी होणे, हातातून वस्तु, पायातून चप्पल गळून पडणे, त्वचेवर फिक्कट पांढरा लालसर, बधीर असा चट्टा असणे, कानाच्या पाळया जाड होणे, त्वचेवर गाठी येणे इत्यादी दिसून येतात. मात्र सुरुवातीच्या अवस्थेत त्याचा कोणताही त्रास होत नसल्यामुळे लोक तपासणीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तींना संसर्ग होवून रोगाचा प्रसार होतो. यासाठी एकाच वेळी सर्व लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करुन त्यांची कुष्ठरोगासाठी तपासणी करण्यासाठी “कुष्ठरुग्ण शोध मोहिम २०२४-२५” दिनांक ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये आशा कार्यकर्ती व पुरुष स्वयंसेवकामार्फत यांचे एक पथक याप्रमाणे एकूण २ हजार ८६१ पथकांमार्फत ग्रामीण भागातील संपूर्ण लोकसंख्येची तर शहरी भागातील जोखमीच्या लोकसंख्येची कुष्ठरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील व शहरी भागातील असे एकूण २६ लाख ७६ हजार ३५० लोकसंख्येची तपासणी होणार आहे. यामुळे लवकरात लवकर कुष्ठरुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणून संसर्गाचा प्रसार रोखणे व त्यांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक गोळी रिफॅम्पीसीनची देऊन त्यांचा संसर्गाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करता येऊ शकतो. याद्वारे सन २०२७ पर्यंत “कुष्ठरोगाच्या संसर्गाचे प्रमाण शून्यावर आणणे” हे ध्येय गाठू शकतो.
जिल्हा माहिती कार्यालय सातारा
