

व्यवसाय आणि समाज विकास व समृद्धीस चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध : श्रीमंत संजीवराजे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २७) :-
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. आणि मॅग्नेशिया केमिकल्स व अरिस्टा केमिकल्स या कंपन्यांच्यावतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व डॉ. जयसिंह मारवाह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सोबत तेथील गुंतवणुकीच्या संधी आणि समूह कंपन्यांसाठी विस्ताराच्या संधी याबाबत चर्चा केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट २०२५ च्या विशेष संवाद सत्रात सहभागी होऊन येथे आल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
मध्य प्रदेश, देशात सुमारे ९ ते १० % दूध उत्पादन करताना ३ ऱ्या क्रमांकावर आहे. मध्यप्रदेश राज्य सरकार शेतकऱ्यांना प्राणी पालन व दुग्ध उत्पादनाच्या सोयी उपलब्ध करुन देत राज्याला देशातील अग्रेसर बनविण्याचे प्रयत्न करत असल्याने राज्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रचंड विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, ज्याचा उपयोग दुग्ध उत्पादक कंपनी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सला होऊ शकतो, तसेच रसायन, औषध निर्माण, पेट्रोकेमिकल्स आणि प्लास्टिकसारख्या क्षेत्रांसाठी उत्कृष्ट उद्योग पर्यावरण असलेल्या मध्य प्रदेशात रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगात अनेक अग्रगण्य खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या कार्यरत असल्याने आमच्या मॅग्नेशिया केमिकल्स आणि अरिस्टा केमिकल्स यांसारख्या विशेष रसायन उत्पादन युनिट्सच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर संधी तेथे उपलब्ध असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, IIEBM च्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २५-३० % विद्यार्थी दरवर्षी मध्य प्रदेशातून पुण्यात पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षणासाठी येतात, ही बाबही उल्लेखनीय असल्याचे डॉ. जयसिंह मारवाह यांनी आवर्जून सांगितले.
गोविंद मिल्कच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय आणि समाजाच्या विकास आणि समृद्धीस चालना देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असल्याने मध्य प्रदेशातील संधींचा लाभ निश्चित घेऊ असा विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
या विशेष संवाद सत्रात आमच्या संस्थांना सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल CII पुणे ऑफिसचे उपसंचालक व प्रमुख प्रसाद बच्छाव, उपसंचालक विशाल लाल आणि कार्यकारी खुशाल बोरघरे यांचे विशेष आभार यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

