
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २८):-
राज्य परिवहन महामंडळ ( एस.टी.) प्रति वर्षी इंधन बचत मासिक कार्यक्रम राबवत असते. राज्य परिवहन फलटण आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम उद्घाटन यशवंतराव चव्हाण जूनियर कॉलेज फलटणचे प्राध्यापक श्री. शंभूराज शिंदे व प्राध्यापक श्री.धनंजय सस्ते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी आगार व्यवस्थापक श्री राहुल वाघमोडे होते. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री.शुभम रणवरे , वाहतूक निरीक्षक श्री. राजेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री.सुखदेव अहिवळे बहुसंख्य चालक – वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.शिंदे व प्रा. सस्ते यांनी डिझेल बचत ही काळाची गरज असून, डिझेल पेट्रोल करिता आपले परकीय चलन फार मोठ्या प्रमाणात खर्च होते. चालकांनी जास्तीत जास्त डिझेल वाचवून आपल्या देशाला आत्मनिर्भर केले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी बसेसची वेळोवेळी आवश्यक ती दुरुस्ती करून इंधन बचतीला हातभार लावावा असेही प्रतिपादन केले.
यावेळी चालक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा फलटण आगाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
