माता पालकांनी लुटावे विचारांचे वाण: डॉ. सुनिता निंबाळकर

माता-पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. सुनिता निंबाळकर व इतर मान्यवर महिला भगिनी

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ०४):-

महिला या केवळ शारिरिक दृष्ट्याच नाही, तर मानसिक दृष्ट्याही स्वस्थ असाव्यात असे मत डॉ. सुनिता निंबाळकर, भूलतज्ज्ञ यांनी मुधोजी महाविद्यालयात आयोजित माता-पालक मेळाव्यात मांडले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालय फलटण येथे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महिला अभ्यास केंद्र व महिला विकास समिती, तसेच लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने “माता पालक मेळावा” हा कार्यक्रम दि. 30 जाने. 2025 रोजी उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत उदाहरणअर्थ ॲडमिशन, पालक मिटिंग यांत त्यांच्या घरातील लोकांचा सहभाग कमी आढळतो. शिक्षणरूपी वाघिणीचे दूध पिऊन उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातांचा मोठा वाटा असतो. म्हणून या माता पालकांना आपला पाल्य जिथे शिकतो ते नुकतेच NAAC द्वारे A+ श्रेणीने मूल्यांकित मुधोजी महाविद्यालय, त्याचा परिसर पाहता यावा, शिक्षकांशी भेटी घेता याव्यात तसेच स्त्री आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यात जागृती करता यावी या उद्देशाने संक्रांतीच्या हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून हा माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ. सुनिता निंबाळकर (भूलतज्ज्ञ) उपस्थित होत्या, तसेच लायन्स क्लबच्या अध्यक्ष सौ. स्वाती चोरमले, सौ. संजिवनी कदम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम सर यांनी भूषविले.


या कार्यक्रमात महिलांचे मानसिक आरोग्य, वयानुसार बदलणारी मानसिक स्थिती, मानसिक दृष्ट्या सशक्त राहण्यासाठी करायचे जीवनशैली बदल, व्यायाम, सकस आहार, वैचारिक बदल इ. विषयी डॉ.सौ. निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. कुटुंबाचा कणा बनून कुटुंब सांभाळणाऱ्या या महिलांना त्यांनी “Domestic Engineer” अशी पदवी देऊन गौरविले.
कार्यक्रमास आलेल्या माता पालकांचे स्वागत महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्राद्वारे करण्यात आले. त्यांना संक्रांतीचे वाण म्हणून पुस्तकरूपी भेट देण्यात आली. वैचारिक बदल केले असता चांगले स्वास्थ्य सहज शक्य आहे अशा शब्दात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कदम सर यांनी व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सर्व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, शाखा प्रमुख व सर्व महिला प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

मुधोजी महाविद्याल‌याचे स्त्री अभ्यास केंद्र व महिला विकास समीती,विद्यार्थीनीच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबिविले जातात. तसेच फलटण तालुक्याच्या परिसरातील गुणवंत महिलांचा गौरव करण्यासाठी विजयमाला पुरस्कार प्रदान करीत आहे.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ सौ सिता जगताप, पाहुण्यांचा
परिचय प्रा. सौ निलम देशमुख, तर आभार सौ उमा भोसले यांनी
केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ प्रा. गायत्री पवार यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!