‘लोकजागर’ ने विधायक कामांना व्यापक प्रसिद्धी द्यावी : दिलीपसिंह भोसले

‘लोकजागर’ च्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ

‘लोकजागर’ न्यूज पोर्टलचा शुभारंभ करताना दिलीपसिंह भोसले. सोबत रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, महादेव गुंजवटे, अमर शेंडे, रोहित वाकडे, पोपट मिंड, विकास शिंदे, यशवंत खलाटे – पाटील.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ०४ फेब्रुवारी २०२५ ):-

‘‘‘लोकजागर’ ने रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात आजवर फलटण शहरात विविध सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम केले आहे. आता ‘न्यूज पोर्टल’च्या माध्यमातून सामाजिक, शिक्षण, साहित्यिक, राजकारण अशा सर्वच क्षेत्रातील विधायक कामांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे काम करावे’’, अशी अपेक्षा श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केली.

येथील साप्ताहिक ‘लोकजागर’ या वृत्तपत्राच्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकजागर’चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, पत्रकार यशवंत खलाटे – पाटील, किरण बोळे, पोपट मिंड, युवराज पवार, अ‍ॅड. रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभटे, विकास शिंदे, काकासाहेब खराडे, ऋषिकेश आढाव, योगेश गंगतीरे, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘‘रविंद्र बेडकिहाळ यांनी आजवर ‘लोकजागर’च्या माध्यमातून ‘मार्गदर्शका’ची भूमिका बजावली आहे. आता त्यांनी या ‘न्यूज पोर्टल’च्या माध्यमातून प्रामुख्याने फलटण शहरातील समस्यांवर लक्ष वेधून समाजाला जागृत करण्याचे काम करावे’’, असे सांगून ‘‘न्यूज पोर्टलच्या उपक्रमात माझे सर्वतोपरी सहकार्य राहील’’, असेही अभिवचन दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी दिले.

अरविंद मेहता म्हणाले, ‘‘फलटण शहर व तालुक्याच्या विकासात ‘लोकजागर’ ने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक नेते – कार्यकर्ते रविंद्र बेडकिहाळ यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ‘लोकजागर’ कार्यालयात आजही येत असतात. गेली 44 वर्षे साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होणारे ‘लोकजागर’ आता न्यूज पोर्टलद्वारे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणार आहे.’’

‘‘सन 1980 पासून ‘लोकजागर’ हे वृत्तपत्र साप्ताहिक स्वरुपात फलटण येथून प्रसिद्ध होत आहे. ‘वसा लोकजागृतीचा’ हे ब्रिद अंगिकारुन शिक्षण, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आदी समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम ‘लोकजागर’ मधून नियमितपणे होत असते. काळानुरुप झालेल्या माध्यम क्षेत्रातील बदलानुसार वृत्तपत्राबरोबरच ‘लोकजागर’ने डिजीटल माध्यमात या न्यूज पोर्टलद्वारे पदार्पण केले आहे. वाचकांना उपयोगी बातम्या, लेख आदींना व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देण्याचे काम या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून केले जाणार आहे.’’, असे ‘लोकजागर’चे संपादक रोहित वाकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

‘‘‘लोकजागर’ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना बातमी, लेख याद्वारे लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले जाईल’’, असे सांगून अमर शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!