सामाजिक संवेदना हा साहित्यनिर्मितीचा कणा होय – विलास वरे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दी. २०):-
मानवी जीवनातील सुख-दुःख, समाजातील विविध प्रवृत्ती आणि परिस्थिती यांचे प्रभावी चित्रण हे साहित्याचे मूलभूत अंग आहे. साहित्य हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते समाजमन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. समाजातील वेदना, आशा, आकांक्षा आणि संघर्ष यांना साहित्यस्पर्श झाला की ते साहित्य वाचकांना अंतर्मुख करते. त्यामुळेच सामाजिक संवेदना हा साहित्यनिर्मितीचा कणा ठरतो. असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकर श्री. विलास वरे यांनी केले. मुधोजी महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मानव्यविद्याशाखा आयोजित ‘समाज- भाषा’ महोत्सव अंतर्गत ’संवाद लेखकाशी‘ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर साहित्यिक श्री. विक्रम आपटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्व्यक डॉ.तुकाराम शिंदे, मानव्यशास्त्र शाखा प्रमुख डॉ. अशोक शिंदे, पदव्युत्तर शाखा प्रमुख डॉ. सरिता माने यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना श्री वरे पुढे म्हणाले, की लेखक आपल्या संवेदनशीलतेने समाजातील प्रश्नांना अधोरेखित करतो आणि विचारप्रवृत्त करतो. संत साहित्यातील करुणा, आधुनिक साहित्याची वास्तवदर्शी मांडणी आणि लोकसाहित्याचा लोकजीवनाशी असलेला संवाद हे साहित्याच्या सामाजिक जडणघडणीचे महत्त्वाचे पैलू आहेत. समाजात घडणाऱ्या घटना, सामाजिक चळवळी, अन्याय-अत्याचार, विषमता यांसारख्या बाबींचे प्रतिबिंब साहित्यकृतीत उमटत असते. कवी, लेखक, नाटककार हे समाजाचे सजग प्रहरी असतात. त्यांना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील दुःख, वेदना आणि संघर्ष मांडण्याची जबाबदारी असते. म्हणूनच सामाजिक संवेदना ही साहित्य निर्मितीच्या मुळाशी असते हा विचार त्यांनी यावेळी प्रकर्षाने मांडला.
लेखन प्रेरणा, कथानक रचना, व्यक्तीरेखाटन व प्रसंग निर्मिती इ. साहित्य निर्मितीच्या प्रमुख घटकांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात असलेली जिज्ञासा, कुतूहल व प्रश्न थेट लेखकाशी संवाद साधत समजून घेण्याचा प्रयत्न ‘लेखक संवाद‘ या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी श्री. वरे यांच्या कादंबऱ्यांचा इंग्लिश अनुवाद करणारे अनुवादक प्रा. विक्रम आपटे यांनी त्यांच्या साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारून श्री. वरे यांना बोलते केले. यावेळी श्री. वरे यांनी आपल्या ध्येयांतर, भावनांतर, जीवनांतर, मरणखुणा, वांझपण देगा देवा, बा आणि ते पंधरा दिवस या कादंबऱ्यांची निर्मिती व मांडणी बाबत विस्तृत विवेचन केले. याशिवाय ‘बहिष्कृतांचे अंतरंग’ कथासंग्राहाचा लेखन प्रवासाही त्यांनी सविस्तर कथन केला. कुष्ठरोगी जणांना जगावे लागणारे बहिष्कृत जीवन आपल्या लेखणीमुळे वाचकांसमोर आणता आले. या निमित्ताने कुष्ठरोगी जणांची सेवा व त्यांना काहीसा आधार देता आला याचेही समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी अनेक कुष्ठरोगी जणांना बरे केल्याची उदाहरणेही सांगितली. तसेच यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनीही साहित्य निर्मिती संबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्न व उत्तराच्या निमित्ताने श्री. वरे यांनी उत्तम संवाद साधला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पंढरीनाथ कदम यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लेखकाला भेटण्याची व साहित्य निर्मिती तथा स्वरूपाबाबत जाणून घेण्याची एक उत्तम संधी विद्यार्थांना प्राप्त झाली आहे असे विचार व्यक्त करून विद्यार्थ्यानी या माध्यमातून साहित्य निर्मितीकडे पाऊल टाकावे असे आवाहनही त्यांनी केले .
कार्यक्रमाचा प्रारंभी श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानव्यशास्त्र शाखा प्रमुख डॉ. अशोक शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर पदव्युत्तर शाखा प्रमुख डॉ. सरिता माने यांनी लेखक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
श्री. अभिषेक धुलगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. नवनाथ रासकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती लाभली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!