प्रा. रविंद्र कोकरे यांच्या कथासंग्रहांचे नवी दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे, मंत्री उदय सामंत, खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून विशेष कौतुक

बंड’ व ‘इजाळ’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे. सोबत लेखक प्रा. रविंद्र कोकरे, रविंद्र बेडकिहाळ, भाऊ तोरसेकर व मान्यवर.

प्रा. रविंद्र कोकरे यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना मंत्री उदय सामंत.

प्रा. रविंद्र कोकरे यांच्या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना खा.सुप्रिया सुळे.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २५):-

येथील प्रसिद्ध कथाकथनकार, वक्ते, समाजप्रबोधनकार प्रा. रविंद्र कोकरे यांच्या बंड व इजाळ या दोन नवीन कथासंग्रहांचे प्रकाशन नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या या कथासंग्रहांचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे, मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, खा. सुप्रिया सुळे यांनी विशेष कौतुक केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील महात्मा जोतीराव फुले सभामंडपात प्रा. रविंद्र कोकरे यांच्या ‘बंड’ व ‘इजाळ’ या कथासंग्रहांचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे, मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, खा. सुप्रिया सुळे, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे प्रमुख राजन लाखे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, संगिता बर्वे, एकनाथ आव्हाड, किरण केंद्रे, शरद गोरे, घनश्याम पाटील, गिरीश भांडवलकर, प्रा. राजेंद्र आगवणे, युवराज खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांकडून कौतुकाची थाप

प्रा. रविंद्र कोकरे यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी थोडक्यात बोलताना, ना. डॉ. निलम गोर्‍हे म्हणाल्या, ‘‘मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा साहित्यकृती उपयुक्त ठरणार्या आहेत.’’ ना. उदय सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याची जबाबदारी साहित्यिक, कलावंत, आणि आपणा सर्वांची आहे. ही परंपरा जपताना अशा कथासंग्रहांचे महत्त्व लक्षणीय आहे.’’ खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी वाचन संस्कृती वाढणे गरजेचे आहे. ती वाढवण्यात हे कथासंग्रह उपयुक्त ठरतील.’’ प्रा. मिलींद जोशी म्हणाले, ‘‘अस्सल ग्रामीण मातीतल्या भावसंदेवनांचा हुंकार टिपणे हा रविंद्र कोकरे यांच्या लेखणीचा स्थायी भाव असून त्यांचा ‘इजाळ’ हा कथासंग्रह ग्रामीण कथांच्या पंक्तीतील महत्त्वाचा कथासंग्रह आहे.’’ रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘प्रा. रविंद्र कोकरे यांनी ‘बंड’ या कथासंग्रहात स्त्रीच्या मनातील खदखद कथांमधून टिपण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे काम केले आहे. हे अद्वितीय आहे.’’

दरम्यान, प्रा. रविंद्र कोकरे यांचे यापूर्वी ‘छबिना’ व ‘थापणूक’ हे कथासंग्रह प्रकाशित झाले असून ‘बंड’ आणि ‘इजाळ’ या नूतन साहित्यकृतीबद्दल त्यांचे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, संचालक राजेंद्र नागटिळे, अजित गायकवाड, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणचे प्राचार्य रणदेव खराडे, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदींसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!