भारतीय संघाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी, न्यूझीलंडचा केला चार विकेटने पराभव

फलटण टुडे वृत्तसेवा (दुबई दि.१० मार्च २०२५): –
रोहित शर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने यावेळी न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला घेतला व भारताने अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत पाकिस्तानसह सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये साकारली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. रोहित शर्माच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे भारताने न्यूझीलंडला २५१ धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण रोहित शर्माने एकहाती तुफानी फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. श्रेयस अय्यरनेही यावेळी ४८धावा केल्या खऱ्या, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. पण तरीही भारताने हा सामना जिंकला. भारताचे हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद आहे. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा २५ वर्षांपूर्वीचा बदला या विजयासह घेतला आहे. कारण २००० साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने यावेळी चार विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

न्यूझीलंडने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. पण कुलदीप यादवने राचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन यांना बाद केले. त्यामुळे भारताला न्यूझीलंडच्या धावांवर अंकुश ठेवता आले. पण डॅरिल मिचेल आणि ब्रेसवेल यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे न्यूझीलंडला २५१ धावा करता आल्या.

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला खरा, पण पहिल्याच षटकापासून रोहित शर्माने आपले इरादे स्पष्ट केले होते. यावेळी शुभमन गिल हा फक्त रोहित शर्माची फटकेबाजी पाहण्याचे काम करत होता. कारण रोहित शर्मा आपल्या पोतडीतून एकामागून एक फटके काढत होता. रोहित शर्माने आपले अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला होता. रोहितला श्रेयस अय्यर चांगली साथ देत होता. पण यावेळी फिरकीपटूंनी या दोघांवर दडपण आणले आणि रोहित शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. रोहितने यावेळी सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली.

रोहित बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तो संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत होता. पण या नादात त्याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट बहाल केली. श्रेयसने यावेळी ४८ धावा केल्या. श्रेयस बाद झाल्यावर अक्षर पटेल सेट झाला होता. पण त्यानेही मोठा फटका मारत आपली विकेट सोडली, त्याने २९ धावांची भर टाकली. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!