बारामती नगर परिषदेतील नगररचनाकार अँटी करप्शनच्या जाळ्यात

गृहप्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी 2 लाखांची लाच मागणारा बारामती नगर परिषदेतील नगररचनाकार अँटी करप्शनच्या जाळ्यात

फलटण टुडे (बारामती दि २१ मार्च २०२५): – बारामती येथील गृहप्रकल्पाचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना बारामती नगर परिषदेतील नगर रचनाकार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

विकास किसनराव ढेकळे (वय ५०, रा. बारामती) असे या नगररचनाकाराचे नाव आहे.याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांची एक फर्म असून त्यांचे (रुई) बारामती येथे निर्मित विहार इमारत बी विंग १ या गृहप्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगरपरिषदेत दाखल केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्याकरीता नगर रचनाकार विकास ढेकळे याने त्यांच्याकडे २ लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ मार्च रोजी आली. त्याअनुषंगाने १९ मार्च रोजी पडताळणी केली. त्यात विकास ढेकळे याने तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बारामती येथील ऑक्सिजन जीम येथे पहिला हप्ता घेऊन येण्यास तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख रुपये घेताना विकास ढेकळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करीत आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!