स्पर्धात्मक दर आणि उत्तम प्रकारे कारखाना चालवण्याच्या पद्धतीने श्रीराम सुस्थितित विरोधकांकचे आरोप बिनबुडाचे : श्रीमंत संजीवराजे

श्रीराम – जवाहरने गेल्या दोन वर्षामध्ये एफआरपी पेक्षा अधिक दर दिला

फलटण टुडे ( फलटण दि २३ मार्च २०२५):-
‘’शेतकर्‍यांना ऊसाला योग्य दर हवाय आणि तो वेळेत मिळायला पाहिजे. स्पर्धात्मक दर आणि उत्तम प्रकारे कारखाना चालवण्याच्या पद्धतीने श्रीरामचे कामकाज सुरु आहे. गेल्या दोन वर्षामध्ये एफआरपी पेक्षा अधिक दर श्रीराम – जवाहरने दिला आहे. २०२३ – २४ मध्ये एफआरपी २५४४ होती तेव्हा ३१२६ दर आम्ही दिला आहे. चालू वर्षी २८८१ एफआरपी होती; आम्ही ३१०० रुपये दर देवून १०० % ऊसाचे पेमेंट अदा केलेले आहे. श्रीराम कारखाना जवाहरच्या सहकार्यातून उत्तम प्रकारे चालू आहे. त्याच्यात कुठल्याही अडचणी नसून सर्व नियमांना धरुन त्या ठिकाणी कामकाज चालत आहे’’, विरोधकांकचे आरोप बिनबुडाचे अशी स्पष्टोक्ती श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीनंतर विरोधकांकडून झालेल्या आरोप – प्रत्यारोपाला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी व्हाईस चेअरमन नितीन भोसले यांच्यासह माजी संचालक उपस्थित होते.

‘‘श्रीराम सहकारी साखर कारखाना आज अवसायनात काढण्याची परिस्थिती असल्याचे व कारखान्याला जवळपास १०० कोटीची देणी असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. वास्तविक पाहता कारखान्यामध्ये अशी कोणतीही परिस्थिती नसून कारखाना अवसायनात काढायची स्थिती असती तर आज कारखान्याला ऊसाला दर सुद्धा देता आला नसता. त्याठिकाणी कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत, भविष्य निर्वाह निधीचा एक रुपयाही राहिलेला नाही, ग्रॅच्युएटी वेळेवर दिली जात आहे. कारखाना वेगाने पुढे जात असून चालू वर्षी ५ हजार टन ऊस आम्ही गाळून दाखवला आहे. पुढच्या एक – दोन वर्षात १० हजार टन कारखान्याची गाळप क्षमता होईल. ९० हजार लिटरची डिस्लरी सुरु होईल. श्रीराम जवाहर एकत्रित काम करत असल्यावरुन आरोप झाले आहेत. त्या सर्व आरोपांना कुठलाही आधार नाही. आम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला साखर आयुक्त, मंत्री समिती यांची मान्यता घेऊन कामकाज केलेले आहे’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

‘‘केन डेव्हलपेंटचं काम आपल्या भागात श्रीराम सोडून कुणीही केलेलं नाही. ड्रोनद्वारे आपण शेतकर्‍यांना औषध फवारणी करुन देत आहोत, शेतकर्‍यांना ड्रीप यंत्रणा देवून खतांचे वाटप करण्याचेही नियोजन केलेले आहे, ऊस वाढीच्या दृष्टीकोनातून या सर्व योजना सुरु केलेल्या आहेत. हंगाम जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऊस लावायला आपण शेतकर्‍यांना प्रवृत्त करत आहोत, उशिरा तुटणार्‍या ऊसाला सबसिडी देवून तो ऊस आणण्याचे नियोजन केलेले आहे. ऊस तोडणार्‍या कामगारांच्या अडचणी लक्षात घेता ऊस तोडणी ही मशिनरीने कशी करता येईल यादृष्टीने मार्गदर्शन करायला सुरुवात आपण केलेली आहे. साखर कारखान्याचे उत्तम युनिट या ठिकाणी चालवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

‘‘कारखाना चालवताना आम्ही कधीही राजकारण आणलेले नाही. याची माहिती अ‍ॅड. नरसिंह निकम यांना आहे. वार्षिक सभेत त्यांना नेहमीच बोलायची संधी दिलेली आहे. त्यांना व्यवस्थित उत्तरेही आम्ही दिलेली आहेत. प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांच्याकडे साखरवाडीचा कारखाना होता. अख्या हंगामाचा १ रुपयाही त्यांनी दिला नाही. त्यांनी साखरवाडीचा कारखाना बुडवला आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं हे हास्यस्पद आहे. त्यांनी केलेले उद्योग दुरुस्त करण्याचे काम आ. श्रीमंत रामराजेंना करावं लागलं. ’’, अशी टिकाही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केली.

श्रीराम कारखाना कर्जमुक्तच : डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे स्पष्टीकरण

‘‘शासनाची पूर्वीची थकीत देणी, जवाहरचे काही २१ – २२ कोटी आणि पूर्वी घेतलेल्या एच्छिक ठेवींपैकी ४५ लाख रुपये कारखान्याने देणं राहिलं आहे. याच्या व्यतिरिक्त कारखान्यावर सद्यस्थितीत व्याजाचं कुठलंही कर्ज नाही. जवाहरने आत्ता गाळप क्षमता वाढवताना केलेली ८३ कोटीची गुंतवणूकीची रक्कम १५ वर्षानंतर करार संपताना शून्य होणार आहे; तशी कॅश फ्लो ची व्यवस्था आम्ही करुन ठेवलेली आहे. त्यामुळे श्रीरामवर कर्ज आहे असा कुणीही गैरसमज करुन घेऊ नये’’, असे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी यावेळी नमूद केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!