

फलटण टुडे (फलटण दि २९ मार्च २०२५):-
साहित्य हे समाज घडवण्याचे प्रभावी साधन आहे त्यामुळे साहित्यिकांनी आपले लिखाण योग्य पद्धतीने करून समाजाला दिशा दिली पाहिजे. प्रत्येक साहित्यिकाची प्रतिभा या वेगवेगळ्या असतात त्यामुळे साहित्यकृती वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण होतात. साहित्यात वेदना दुःख दारिद्र्य विवंचना दिसली पाहिजे. समाज घडवण्याचे महान कार्य साहित्यिक करत असतात. जे साहित्य वाचाल छापाल व विकले जाईल तेच साहित्य महत्त्वाचे आहे. साहित्याची चूल ही सतत पेटती ठेवली पाहिजे. आपला देश वेगवेगळ्या सामाजिक स्थित्यंतरातून जात आहे यावर साहित्यिकाने प्रकाश टाकला पाहिजे. साहित्य समाजाचा आरसा असतो असे मत फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव यांनी नाना नानी पार्क फलटण येथे आयोजित केलेल्या साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण वनविभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक महादेवराव गुंजवटे होते तर प्राचार्य रवींद्र येवले, सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे संयोजक माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, साहित्यिक सुरेश शिंदे, प्रा विक्रम आपटे,प्रा.सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अभिजीत जाधव पुढे म्हणाले की समाज एकसंघ कसा राहील यावर भाष्य केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन विधायक कार्य केले तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी संवादाची फार गरज आहे हा संवाद फलटणच्या साहित्यिक संवादामध्ये होतो ही बाब कौतुकास्पद आहे. त्यासाठी साहित्यिकांनी समाजभान जपले पाहिजे व निकोप समाज निर्माण केला पाहिजे. निखार्यावरचा जाळ होण्यापेक्षा सुविचारांचा हार झालेले कधीही चांगले.
महादेवराव गुंजवटे म्हणाले की, पहा ऐका व व्यक्त व्हा हाच या साहित्यिक संवादाचा महत्त्वाचा भाग आहे. आज पंचविसावा साहित्यिक संवाद हा विशेष कार्यक्रम साहित्यिक संवाद साहित्य संमेलनाने साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे. नाविन्याचा शोध घेत साहित्यात काम केले तर उत्कृष्ट साहित्य निर्माण होते व हेच साहित्य आपणास ऊर्जा देते. गेल्या दोन वर्षाच्या साहित्यिक संवादातून 20 ते 22 पुस्तके प्रकाशित झाली हेच या साहित्यिक संवादाचे यश आहे. साहित्यिक संवादाने दिलेले लिहिता हाताला बळ. नव लेखकांनी कवींनी बारकाईने वाचन करून सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले तर सकारात्मक विचार जोपासला जाईल. मला काय मिळेल यापेक्षा मला कसे अधिक साहित्यिक ज्ञान मिळेल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. फलटणचा साहित्यिक संवाद हा निश्चितच फलटणकरांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक व संमेलनाचे संयोजक ताराचंद्र आवळे यांनी केले, युवा लेखक विकास शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर रानकवी राहुल निकम यांनी आभार मानले. यावेळी डॉ अशोक शिंदे प्रमोद जगताप अतुल चव्हाण गिरीश बनकर नवनाथ कोलवडकर आशा दळवी गुंडाराज नामदास हरिराम पवार नितीन नाळे भारती जगदाळे संजय पांचाळ यांनी आपल्या विविध आशयाच्या बहारदार कविता सादर करून संमेलनामध्ये एक वेगळाच ठसा उमटवला. यावेळी फलटण तालुक्यातील लेखक कवी साहित्यप्रेमी लिहिते हात व वाचक यांना विशेष सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ऍड श्रेयश कांबळे रोहिणी भंडलकर, वंदना सूळ, राजेंद्र बोंद्रे वीरसेन सोनवणे सचिन जाधव शुभम शेळके अक्षय धायगुडे विकास काळे किशोर कांबळे गणेश रणदिवे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील साहित्यप्रेमी वाचक लेखक कवी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.