करिअर कट्टा उपक्रमात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय पुणे विभागात व जिल्ह्यात प्रथम

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ भरत शिंदे व व्यासपीठावर इतर मान्यवर

फलटण टुडे (बारामती दि ०३ एप्रिल २०२५):-
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार वर्षांपासून राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टा हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षा तयारी आणि करिअर मार्गदर्शनाचे उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या महाविद्यालयांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी, पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने पुणे विभाग आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या वतीने करिअर कट्टा समन्वयक डॉ. सुनील ओगले, जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे आणि डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या वेळी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, दुबई सरकारचे टेक्निकल ॲडव्हायझर सोमनाथ पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन ईटकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संचालक यशवंत शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नाही. त्यासोबतच व्यावहारिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यापीठांतर्गत कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीतून बाहेर पडून नवीन कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा मानस आहे.”

याप्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा उपक्रमाच्या दैनंदिन कार्यपद्धतीची माहिती दिली. पुणे विभागातील एकूण ७१ पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी केले, तर जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!