मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन 

फलटण टुडे (सातारा, दि. ०५ एप्रिल २०२५):  

  राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरिता करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने “मिशन लक्ष्यवेध या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. योजनेच्या लाभासाठी 7 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या मैदानी, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शूटिंग, सेलिंग, टेबल-टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणा-या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमींच्या कामगिरींचे गुणांकण करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करण्या-या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणा-या संस्था ब वर्ग, ७६ ते १०० गुण प्राप्त   करणा-या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
 तरी सातारा जिल्ह्यातील अकादमी, संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ७ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!