उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे, मंत्री मकरंद पाटील यांची उपस्थिती


फलटण टुडे (सातारा दि २० – गेले 60 वर्षे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कार्य, पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक उभारणारे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, मसाप, पुणेचे जिल्हा प्रतिनिधी, साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांच्या कार्याचा गौरव समारंभ साता-यात शनिवार दि.19 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मावळा फौंडेशन आणि जिल्हयातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे हा गौरव समारंभ होणार असल्याची माहिती सोहळ्याचे निमंत्रक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे आणि रवींद्र बेडकिहाळ गौरव समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणा-या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते श्री. बेडकिहाळ यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
एखाद्या कार्यामध्ये झोकून दिल्यावर ध्यास म्हणून सातत्याने कार्यरत राहणे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण रवींद्र बेडकिहाळ यांच्याकडे पाहिले जाते. १९६८ पासून गेली ५७ वर्षे श्री. बेडकिहाळ हे विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांवरील आपद्ग्रप्रसंगात त्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी त्वरित अर्थसाह्याचा हात देण्यासाठी त्यांनी दि.६ जानेवारी १९८७ रोजी सातारा येथूनच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या स्वायत्त विश्वस्त संस्थेची स्थापना केली. राज्यात तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात सुध्दा त्यांच्या निधनानंतर १४७ वर्षांमध्ये कोणीही स्मारक उभारले नव्हते. परंतु या दुर्गम भागामध्ये त्यांनी सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून १९९३ मध्ये बाळशास्त्रींच्या जन्म गावी पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे राज्यातील पहिले स्मारक म्हणून ‘दर्पण’ सभागृह उभारले. गेली ३५ वर्षे तिथे विविध कार्यक्रमातून व राज्यातील गुणवंत पत्रकारांना ‘दर्पण पुरस्कार’ देऊन आजही बाळशास्त्रींची स्मृती जिवंत ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून “आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर कर्तृत्वाचा एक शोध” हा बृहद् ग्रंथ तीन खंडांमध्ये २२०० पृष्ठांचा लवकरच प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे.
१९९३ मध्ये कै.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे अत्यंत दिमाखात झाले होते. परंतु त्यानंतर सातारा जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ जवळ जवळ थांबली होती. २०१०मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ अशा संस्थेवर संघर्षातूनच ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेले तेव्हा पासून सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ७ नवीन शाखा स्थापन केल्या. सातारा जिल्ह्यात पुन्हा विविध विभागीय साहित्य संमेलने,कवी संमेलने, शिवार साहित्य संमेलने, साहित्य विषयक चर्चासत्रे – परिसंवाद, मराठी भाषा पंधरावडा असे अनेक कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनातून सुरू झाले ते आजही सुरू आहेत.
कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचा सांस्कृतिक वारसा पुढे चालणारे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील मराठी भाषा अभिजात दर्जा चळवळीत दिल्ली मधील कडाक्याच्या थंडीतील धरणे आंदोलनात श्री. बेडकिहाळ यांनी दिलेले योगदान संस्मरणीय आहे. जिल्ह्यातील अनेक लेखक, कवी, वक्ते यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सहभागी होण्याची संधी त्यांनी दिली. परिषदेतील अनेक नव्या उपक्रमांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे दोन वर्षाच्या अथक परिश्रमातून ११९ वर्षाच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेमध्ये आधुनिक काळाशी सुसंगत अशी दुरुस्त करून याच वर्षी सर्वच मराठी भाषा संस्थांना मार्गदर्शक ठरावी अशी नवी घटना त्यांनी करून दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील कवी यशवंत,मर्ढे सातारा येथील आधुनिक कविवर्य बा.सी.मर्ढेकर, रहिमतपूर येथील कवी गिरीश यांच्या स्मारक कार्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले. फलटण येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला व महाराष्ट्र महाराष्ट्राचे थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दरवर्षी यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन गेली १४ वर्षे आयोजित करण्यात येते.
जेष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लागू करून आता त्यांना दरमहा 20 हजार रुपये सन्मानधन शासनातून मंजूर करण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे. आजही वयाच्या ८१ वर्षी पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक कार्यात ते उत्साहाने मार्गदर्शन करत आहेत. या सर्व कार्याबद्दल श्री. बेडकिहाळ यांचा गौरव करण्यात येणार असून या समारंभास जिल्हयातील सर्व पत्रकार, साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.