
फलटण टुडे ( फलटण दि २७ एप्रिल २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला व विचारांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे, विभागप्रमुख, प्राध्यापकगण, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. शिक्षण क्षेत्रात महात्मा फुले यांनी केलेल्या भरीव योगदानाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे विचार वक्त्यांनी मांडले.मनोगतांमधून त्यांच्या विचारांची दिशा आजच्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवकांनी त्यांचा आदर्श ठेवून शिक्षण, कष्ट आणि नैतिक मूल्यांच्या आधारे आपले जीवन समृद्ध करावे, असा संदेश देण्यात आला.
महाविद्यालयातील विशेष दिन समितीमार्फत दरवर्षी महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यात येतात. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक समृद्धी, सामाजिक भान आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव विकसित केली जाते.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विशेष दिन समितीच्या कार्याचे कौतुक केले. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे विचार काळानुरूप आजही तितकेच प्रासंगिक असून तरुण पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन विशेष दिन समितीच्या समन्वयक प्रा. सौ. पी. एस. जाधव यांनी केले. त्यांच्यासह समितीतील सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शांत, सन्मानपूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
यानिमित्ताने फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आणि सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.