
फलटण टुडे (फलटण दि २८ एप्रिल २०२५):-
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती ( परंपरेप्रमाणे ) मंगळवार 29 एप्रिल 2025 रोजी मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे . शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटण तालुका छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली . सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा . नितीन बानगुडे पाटील यांचे ” छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा शिवराज्याचा छावा ” हे व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक , फलटण या ठिकाणी होणार आहे
मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बाईक रॅली निघणार आहे . ही रॅली माळजाई मंदिर परिसरातून सुरु होणार असून या रॅलीमध्ये तालुक्यातील युवक -युवती , महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे . छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुका यांच्या वतीने 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता माळजाई मंदिर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे . शिवजयंती मिरवणुकी सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक

चित्ररथांबरोबरच भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , अहिल्यादेवी होळकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , शूर जिवा महाले , यांच्यासह विविध महामानवांचे चित्ररथ फलटणच्या शिवजयंतीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत . तर या मिरवणूकीत हत्ती , घोडे त्यावर शिवकालीन पोशावात युवक- युवती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहेत . मिरवणुकीत ढोल- ताशे , लेझर शो आणि शिवकालीन पोशाखधारी कलाकारांचा समावेश असेल . यंदाच्या शिवजयंती उत्सवाला भव्य स्वरूप देण्यात आले आले आहे . शहरातील छत्रपती शिवाजी महाराज
चौक , छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर आणि गजानन चौक येथे ऐतिहासिक कमानी , भगवामय सजावट आणि अश्वारुढ पुतळ्यांनी शिवभक्तांना आकर्षित केले आहे . ग्रामीण – शहरी क्षेत्रातील विविध मंडळांनी गड- किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्याची तयारीही केली आहे .
