
कै. रामकृष्ण सुरवडे
फलटण टुडे (जळोची दि ०४ मे २०२५):-
वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टचे माजी विश्वस्त कै. रामकृष्ण लिंबराज सुरवडे, वय वर्षे ८७ यांनी शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी ९.५० वा. अखेरचा श्वास घेतला. दहा वर्षापूर्वी त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा कुटुंबाकडे व्यक्त करून मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र करून ठेवले होते. त्यांच्या इच्छेचा आदर करत त्यांच्या परिवाराने बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास सर्व सोपस्कर बाबी पूर्ण करून सुपूर्द केला.
या प्रसंगी महाविद्यालय मधील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
त्यांच्या देहदानामुळे महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर तयार होण्यास व मृत शरीराचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून व विशेषतः लिंगायत समाजातून खूप कौतुक होत आहे. भविष्यात अनेकांना त्यांचे देहदान प्रेरणादायी ठरेल.
कै. रामकृष्ण सुरवडे हे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रजिस्ट्रार यापदावरून सेवानिवृत्त झाले होते. समाजात त्यांना सुरवडे सर म्हणूनच सर्वजण ओळखत होते. त्यांच्या जीवनप्रवासात ते अनेक चढ-उतारांना सामोरे जात नोकरीसोबत होमगार्ड, शारदाबाई पवार महाविद्यालय, वीरशैव नागरी पतसंस्था, प्रतिभा नागरी पतसंस्था, जीवाभाई कोठारी ट्रस्ट, वृद्धाश्रम, बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघ, ओंकारेश्वर सोसायटी अशा विविध संस्थाशी कार्यरत होते. अनेक संस्थांचे त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.