
‘‘पाटी’ एकांकिके मधील कलाकार व इतर मान्यवर
फलटण टुडे (बारामती दि १८ मे २०२५):-
विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगकर्मींची सादर केलेली ‘पाटी’ ही एकांकिका अजितपर्व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत झळकली आणि एकूण ५१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक व करंडक पटकावत भरघोस यश मिळवले.
या एकांकिकेने केवळ सांघिक प्रथम क्रमांक मिळवला नाही, तर दिग्दर्शन व अभिनय अशा प्रमुख श्रेणींमध्येही बाजी मारली.
या स्पर्धेत ‘पाटी’ एकांकिकेचे दिग्दर्शक सुबोधन जोशी व आदेश यादव यांना दिग्दर्शनाचा प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्या प्रभावी संकल्पना, भेदक दृश्यरचना आणि कसदार सादरीकरणामुळे प्रेक्षक आणि परीक्षक मंत्रमुग्ध झाले. अभिनयाच्या श्रेणीत देखील श्रध्दा रंगारी हिने स्त्री अभिनयाचा प्रथम क्रमांक पटकावला. तिची भूमिकेतली संवेदनशीलता आणि भावनांची सखोल मांडणी विशेषत्वाने लक्षात राहिली. सुजल बर्गे याने पुरुष अभिनयाचा प्रथम क्रमांक मिळवून पुन्हा एकदा आपली अभिनय क्षमता सिद्ध केली.
‘पाटी’ एकांकिका सामाजिक आशय आणि मानवी भावभावनांचा समतोल साधणारी प्रभावी कलाकृती ठरली. यातून लेखकाचे प्रगल्भ लेखन, सादरीकरण कौशल्य आणि रंगभूमीवरील समर्पण दिसून आले. या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. हणमंतराव पाटील, आणि मार्गदर्शक प्राध्यापक डॉ अमर भोसले प्रा. विजयराव काकडे यांचे मोलाचे योगदान आहे.
‘पाटी’ एकांकिकेचे हे राज्यस्तरीय यश महाविद्यालयाच्या सांस्कृतिक प्रगतीचा ठसा उमटवणारे ठरले आहे. या एकांकिकेस राज्यस्तरीय स्पर्धेत आजपर्यंत ३८ पुरस्काराने गौरविण्यात आले ही अभिमानाची गोष्ट आहे.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अँड अशोक प्रभुणे सचिव अँड नीलिमा गुजर खजिनदार युगेंद्र पवार सौ सुप्रिया सुळे, सौ सुनेत्रा पवार डॉ राजीव शहा, मंदार सिकची, किरण गुजर ,कर्नल श्रीष कंबोज, प्राचार्य डॉ भरत शिंदे यांनी पाटी या एकांकिकेमधील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.