
डॉ भरत शिंदे
फलटण टुडे (बारामती दि १८ मे २०२५):-
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना प्लस नाईन वन मीडिया तर्फे प्रिन्सिपल ऑफ द एअर फॉर इन्स्टिट्यूट एक्सलेन्स
‘हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, प्रशासकीय व समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद (NAAC) कडून A+ दर्जा बहाल करण्यात आला, जो महाविद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीचे प्रतिक मानला जातो.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या सहकार्याने आणि डॉ. शिंदे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रयोगशाळा, ४० हून अधिक स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही यंत्रणा, सुसज्ज सेमिनार हॉल्स, समृद्ध ग्रंथालय आणि अत्याधुनिक क्रीडांगण यांसारख्या अनेक सुविधा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याच्या दृष्टीने महाविद्यालयाने भरीव कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांमध्ये ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून यश मिळवले आहे, तर सुमारे १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विविध नामांकित क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवला आहे. रितेश धापटे या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर थेट साडेअकरा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवून संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
संशोधन क्षेत्रात डॉ. शिंदे यांचे मोठे योगदान असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली असून सहा विद्यार्थी सध्या पीएच.डी. करत आहेत. त्यांनी स्वतः ८० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत आणि ३५ पुस्तकांचे लेखन केले आहे.
डॉ. भरत शिंदे यांचा हा पुरस्कार हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, तो महाविद्यालयाच्या प्रगतीचा आरसा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे महाविद्यालयाने राष्ट्रीय व राज्यस्तरावर अनेक पुरस्कार व मान्यता मिळवल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

