शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि.१ जुलै २०२५):-:शिक्षण संकुलात शिस्त ही आवश्यक बाब असून शिस्त असेल तर ते शैक्षणिक संकुल सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकते याचे उत्तम उदाहरण श्रीमंत मालोजीराजे शेती संकुल असल्याचे निदर्शनास आणून देत प्राचार्य निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तीने या संकुलाचे कामकाज सुरु असल्यानेच येथे असलेले केवळ माध्यमिक शेती विद्यालयाचे जोडीला आज उद्यानविद्या आणि कृषी महाविद्यालय सुरु झाले असून अन्य कृषी विषयक उपक्रमांच्या माध्यमातून हे शैक्षणिक संकुल राज्यभर नावारुपास आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य संजय वेदपाठक, उपशिक्षक वसंत यादव आणि प्रयोगशाळा सहाय्यक जगन्नाथ तथा भाऊ कापसे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, रणजीत निंबाळकर, कृषी व हॉर्टी महाविद्यालय प्राचार्य यु.डी.चव्हाण, एस.डी.निंबाळकर, श्रीराम कारखाना व्हा.चेअरमन नितीन भोसले, अंबालिका शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेशराव तावरे, श्रीराम कारखाना संचालक महादेवराव माने, मार्केट कमिटी संचालक निलेश कापसे, पंचायत समिती मा.सदस्य वामनराव यादव, जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, सुभाष भांबुरे, दादासाहेब चोरमले, शिंदेवाडीचे माजी सरपंच शंकरराव बर्गे, माजी नगरसेविका सौ.प्रगती कापसे, श्रीराम सोसायटी संचालक शाम कापसे, उद्योजक राजेंद्र कापसे यांच्यासह मालोजीराजे शिक्षण संकुलातील आजी माजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्राचार्य अरविंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम करणे ही गुणवत्तेची वेगळी चाचणी असून त्यामध्ये प्राचार्य वेदपाठक, उपशिक्षक वसंत यादव आणि या माध्यमिक विद्यालयातील किंबहुना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि अन्य शिक्षण विभागातील प्राचार्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उत्तम काम करुन फलटण एज्युकेशन सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यात यशस्वी होत आहेत याचाच अर्थ त्यांनी गुणवत्तेची ही चाचणी यशस्वीरित्या पार केल्याचे स्पष्ट होते आणि म्हणूनच फलटण एज्युकेशन सोसायटी मधील विद्यार्थी विविध क्षेत्रात सतत नावलौकिक मिळवीत आहेत
एकेकाळी येथे असलेले डी.एड.कॉलेज नावाजलेले विद्यालय होते तेथून आणि मालोजीराजे शेती विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवीत आहेत या पाठीमागे प्राचार्य अरविंद निकम यांची शिस्त आणि फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्यालयातील गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता जोपासण्याचे काम येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य वेदपाठक सर हे विद्यादानाचे काम उत्तम करतात तथापि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम पद्धतीने पार पाडल्या आहेत त्याचप्रमाणे वसंत यादव सरांनी ही आपल्या क्षेत्रात उत्तम गुणवत्ता निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत नावाजण्यासारखी आहे आणि जगन्नाथ तथा भाऊ कापसे यांनी शिक्षण संस्थेतील आपली जबाबदारी तर उत्तम पद्धतीने पार पाडली पण त्याचबरोबर आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि त्यापूर्वीही आणि आत्ताही स्वीय सहाय्यक म्हणून पेललेली जबाबदारी निश्चितपणे त्यांच्या गुणवत्तेवर शिक्का मोर्तब करणारी आहे कारण विविध ठिकाणाहून आणि विविध क्षेत्रातून येणाऱ्या लोकांच्या अडचणी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना अत्यंत शांत डोक्याने आणि संयमाने त्यांच्याशी बोलावे लागते त्यामध्ये भाऊ कापसे यांनी पार पाडलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आज त्यांना केवळ फलटण तालुका नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा ओळखतो असे गौरव उद्गार व्यक्त करताना या तीनही व्यक्तींची शासकीय नियमाप्रमाणे सेवापुर्ती झाली असली तरी आगामी काळात त्यांना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कामातून निवृत्ती घेता येणार नाही किंबहुना यांनी आपल्या तीस-पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेप्रमाणे यापुढेही कार्यरत रहावे अशी अपेक्षा श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
तीनही सेवानिवृत्तांना त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो त्यांच्या कुटुंबांनाही उत्तम आरोग्य सुख समाधान लाभो अशी प्रार्थना श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी प्रभू श्री राम चरणी केली.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील शिक्षण हे व्यक्तिमत्व घडविणारे असून त्यासाठी येथील शिक्षकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना कृषी विषयक शिक्षण देताना येथील शिक्षकांनी नेहमीच विद्यार्थ्यांची मानसिकता शारीरिक सक्षमता आणि इच्छाशक्ती वाढविण्याला प्राधान्य देऊन गुणवान विद्यार्थी तयार केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चांगल्या कामाचे श्रेय निश्चितपणाने मिळते त्याचा फायदा कुटुंबाला समाधान देणारा ठरतो आणि म्हणून नेहमी आपली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडण्याला प्राधान्य दिले पाहिजे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य देणारे, गुणवत्तेचे कौतुक करणारे असल्याने त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे झालेल्या चांगल्या कामाचे श्रेय संस्थेला मिळते मात्र संस्था नेहमीच येथील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काळजी घेत असल्याने आपल्याला अधिक उत्साहाने काम करता येते आणि त्यातून मिळालेले समाधान आपल्या कुटुंबाला स्थैर्य समाधान आणि एक प्रकारचे पाठबळ देणारे ठरते आज सेवापुर्ती निमित्त सत्कार होत असलेले तीनही व्यक्तिमत्व दर्जेदार काम करणारी असल्याने सेवापुर्ती नंतरही त्यांची सेवा या संस्थेसाठी अखंडित मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत प्राचार्य अरविंद निकम यांनी तीनही सत्कारमूर्तींचे कौतुक करुन त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य आणि सुख समाधान लाभावे यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना केली.
यावेळी मनोज कदम बाबासाहेब खरात यांची समायोजित भाषणे झाली प्रारंभी उपप्राचार्य काळे सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले समारोप व आभार प्रदर्शन दिवसे सर यांनी केले तर राजश्री शिंदे व शिल्पा इंगवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!