
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १२ जुनै २०२५ ) : – फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळाभाडेवाडी संदर्भात पणन विभागाशी पत्रव्यवहार करून संबंधित गाळेभाडे विषयात अभिप्राय मागवला असून गाळेभाडे संदर्भातील करार सर्व गाळेधारकांच्या सहीनिशी सहमत केला आहे. गाळेभाडे करार हा कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण व गाळेधारकांच्या सहमतीने बैठक घेऊन कागदोपत्री सह्या घेऊन केला आहे. फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने अडते, सहकारी संस्था,व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांना शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी व शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गरजांचा पुरवठा मार्केट यार्डमध्येच व्हावा तसेच व्यापारवृद्धी व्हावी या हेतूने महाड-पंढरपूर रोड, मार्केट यार्ड, फलटण येथे सुपर मार्केट गाळ्यांचे बांधकाम करून सदर गाळे गरजू व्यवसायिकांना मासिक भाडेने दिलेले आहेत. या ठिकाणी पुढील व मागील बाजूस एकूण २४८ गाळे आहेत. सदर गाळ्यांपैकी एकूण १६८ गाळ्यांचे करार संपलेले आहेत अथवा करार नाहीत. या सर्व गाळ्यांचे करार नुतनीकरण करणे आवश्यक आहे.
सदरील गाळ्यांना बाजार समितीने पुढील गाळे व मागील गाळ्यांसाठी खालीलप्रमाणे वेळोवेळी भाडेवाढ केलेली आहे.
वर्ष १९९७ पासून पुढील गाळ्यासाठी 300रुपये तर मागील गाळ्यासाठी २०० रुपये, वर्ष 2009 पासून पुढील गाळ्यासाठी ६०० रुपये तर मागील गाळ्यासाठी ४०० रुपये, वर्ष २०२३ पासून पुढील गाड्यासाठी 1250 रुपये तर मागील गाळ्यासाठी 650 रुपये
सन २०१३-१४ ते २०१५-१६ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवाल, मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचेकडील निर्देशास अनुसरून दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा यांचेकडील भाडेनिश्चितीनुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. तथापि, गाळेधारकांनी केलेले उपोषण, आंदोलन तसेच याबाबत मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, फलटण यांनी केलेली मध्यस्थी विचारात घेऊन मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील भाडेवाढीबाबतच्या प्राप्त होणाऱ्या निर्देशास अधीन राहून, भाडे वसुली योग्य तो जमा खर्च होणेच्या हेतूने सक्तीने वसुली न करण्याचा निर्णय घेतला होता.
सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिटच्या अंमलबजावणीच्या बाबतीत ज्या गाळेधारकांचे करार संपुष्टात आलेले आहेत अथवा ज्यांचे करारच नोंदविण्यात आलेले नाहीत, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविलेल्या दराने सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिट लागू करावे. परंतु ज्या गाळेधारकांचे करार अद्याप संपुष्टात आलेले नाहीत, त्यांच्या बाबतीत करारातील तरतुदीनुसार भाडेवाढबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच पोटभाडेकरू बाबत बाजार समितीने कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी, असे मा. पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे. पुढील गाळ्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविलेल्या दरानुसार मासिक भाडे रक्कम रु. २८३३/- व मागील गाळ्यास मासिक भाडे रक्कम रु. १५३३/- (संकलित कर व GST वगळून) लागू करावे, असे निर्देश पणन संचालनालय यांनी दिले होते.
असे असले तरीदेखील बाजार समिती संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सुपर मार्केट गाळा भाडेवाढीबाबत बाजार समितीने संचालक मंडळ, गाळेधारक यांचेसोबत एकूण ३ समन्वय बैठक घेण्यात आल्या. सुपर मार्केट गाळेधारक, बाजार समितीचे मा. चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सचिव यांचेसोबत दि. ०९/०६/२०२३, दि. २०/०६/२०२३ व दि. ११/०७/२०२३ रोजी सदर विषयावर समन्वय बैठक घेण्यात आली. प्रचलित भाडे आकारणी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मागील भाडे निश्चिती, तत्कालीन सुधारित भाडेवाढ गाळेधारकांनी अमान्य केलेबाबतचा तपशील, भाडेवाढ विरोधातील गाळेधारकांचे उपोषण, मार्केट यार्ड परिसरात इतर ठिकाणी घेण्यात येत असलेले भाडे, आळंदी-पंढरपूर मार्गावरील फलटण लगतचे बाह्यवळण निर्मितीमुळे गाळ्यांचे व्यावसायिकदृष्ट्या कमी झालेले महत्त्व, मार्केट यार्ड परिसरातील व्यवसायाची सद्यस्थिती, तालुक्यातील दुष्काळी स्थिती, गाळे व्यवसायाविना बंद स्थितीत असणे तसेच सन २०२०-२१ व २१-२२ मधील या बाजार समितीच्या शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवालामध्ये “बाजार समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग व बाजारभाव यामधील दुरावा साधून त्यानुसार धोरण ठरवून समन्वय साधून भाडे आकारणीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी” असे नमूद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करून सदर विषयावर विचारविनिमयातून, चर्चेतून आणि सामंजस्याने भाडेवाढ करणेबाबत संबंधित गाळेधारक, संचालक मंडळ, आणि समितीचे सचिव यांचेसोबत घेण्यात आलेल्या दिनांक ११/०७/२०२३ रोजीच्या समन्वय बैठकीमध्ये सुपर मार्केट गाळा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदरील भाडेवाढ दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आली. त्यास अनुसरून पुढील गाळ्यास रु. ६००/- वरून रु. १२५०/- व मागील गाळ्यास रु. ४००/- वरून रु. ६५०/- (GST व संकलित कर वगळून) इतके भाडे अंतिम करण्यात आले. सदरील समन्वय बैठकीतील निर्णयाची नोंद बाजार समिती संचालक मंडळ सभा दिनांक १८/०८/२०२३ ठराव क्र. ५ अन्वये घेण्यात आलेली आहे.