
वाहतुकीसाठी धोकादायक ठिकाणी कठडे नाहीत; नागरिकांच्या जीवितास धोका!
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १३ जुलै २०२५):-फलटण, बारामती व इंदापूर या तीन तालुक्यांना जोडणारा आसू येथील निरा नदीवरील बंधारा अत्यंत धोकादायक स्थितीत असून देखील, येथे अजूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.
केवळ पंधरा दिवसांपूर्वीच एका महिलेचा बंधाऱ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता, आणि आज पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. मारुती सुझुकी बलेनो गाडी थेट बंधाऱ्यात कोसळली.
सुदैवाने घटनास्थळी नागरिक उपस्थित होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दीपगंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अजय शेठ फराटे आणि अॅड. जीवन पवार यांनी प्रसंगावधान राखत गाडीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.
या वेळी अजय शेठ फराटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की:
“या बंधाऱ्यावरून वाहतूक सुरु असताना काठावर कठडे असणे अत्यावश्यक आहे. याशिवाय याच ठिकाणी मंजूर झालेला नवीन बंधारा अद्यापही अपूर्ण आहे, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच मागणी आहे.”
या घटनांवरून प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. बंधाऱ्यावर सुरक्षिततेची उपाययोजना होईपर्यंत वाहतूक थांबवावी, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.