क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित महावाङ्‍‍मयाचे प्रकाशन!

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

फलटण टुडे वृत्तसेवा :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‍‍मय’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेमार्फत या महावाङ्‍‍मयाची निर्मिती करण्यात आली आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्याच्या निर्मितीतून नव्या पिढीपर्यंत पोहोचवला जाईल. या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‍‍मय’ या ग्रंथात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे 23 आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे 14 ग्रंथ, त्यांचा पत्रव्यवहार तसेच महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील महात्मा फुले वाडा आणि नायगाव, सातारा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पसृष्टीची रंगीत छायाचित्रे हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मान्यतेने हा ग्रंथ प्रकाशित झाला असून, प्रत्येक जिल्ह्यात प्रतींचे वितरण जिल्हास्तरीय शिक्षण विभाग, आर्थिक विकास मंडळ तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांमार्फत करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!