राज्यस्तरीय नेहरू चषक पटकावत मुधोजी हायस्कूलच्या महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी

मुधोजी हायस्कूलच्या महिला हॉकी संघाची दिल्ली येथे होणाऱ्या नेहरू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड .
दिल्ली येथील स्पर्धेत महिला संघ करणार महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व

मुधोजी हायस्कूलचा १७ वर्षाखालील महिला हॉकी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,शिवाजीराव घोरपडे ,अरविंद निकम व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३० सप्टेंबर २०२५ ) :-

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धांचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, (बालेवाडी ) पुणे येथे दिनांक २५ ते २७ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, लातूर , छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, क्रीडा प्रबोधिनी नाशिक व कोल्हापूर या नऊ विभागातील महिला हॉकीसंघातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आल्या.सदर स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १७ वर्षाखालील महिला हॉकी संघाने कोल्हापूर विभागाचे या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले.

राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करून स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व दिल्ली येथे होणाऱ्या नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला .

बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय नेहरू स्पर्धेतील कोल्हापूर विभागाचा पहिला सामना मुंबई विभाग विरुद्ध झाला. हा सामना ४/० गोल फरकाने जिंकून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. या सामन्यामध्ये वेदिका वाघमोरे, सिद्धी केंजळे, निकिता वेताळ व अनघा केंजळे यांनी गोल नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेतील उपांत्य सामना अमरावती विभागा विरुद्ध झाला. हा सामना देखील ७/० गोलने एकतर्फी जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या सामन्यामध्ये श्रुतिका घाडगे, श्रद्धा यादव,केतकी बोळे, श्रेया चव्हाण, गायत्री खरात, वेदिका वाघमोरे, व कु.निकिता वेताळ यांनी गोल नोंदवले.

या स्पर्धेतील अंतिम सामना बलाढ्य क्रीडा प्रबोधिनी नाशीक जो रोज एस्टेटर्फ वरती सराव करतो अशा संघाविरुद्ध झाला. पहिल्या दोन सत्रात सामना बरोबरीत रोखला . या सामन्याच्या तिसऱ्या सत्रामध्ये पेनल्टी कॉर्नर वर अनुष्का केंजळे ने उत्कृष्ट गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. व चौथ्या सत्रामध्ये वेदिका वाघमोरे ने उत्कृष्ट मैदानी गोल करत या स्पर्धेचा निर्णायक गोल नोंदवत या स्पर्धेचे ऐतिहासिक असे विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेमध्ये बचाव फळीमध्ये व मधल्या फळीमध्ये मृण्मय घोरपडे, अनुष्का केंजळे, गौरी हिरणवाळे, तेजस्विनी कर्वे, मानसी पवार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच गोल रक्षक म्हणून अनुष्का चव्हाण व आरोही पाटील यांनी देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व या महिला खेळाडूंनी आपली मोहर या स्पर्धेत उमटवत राज्यस्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावून ऐतिहासिक अशा कामगीरीच्या जोरावरती राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषकावर आपला ठसा उमटवत दैदिप्यमान कामगिरी करून दाखवली या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये अंतीम सामन्यात विरोधी संघास एकही गोल करून दिला नाही हा एक नवीन विक्रम देखील या संघाने प्रस्थापीत केला आहे.

१९७८ पासून फलटण येथे सध्याच्या श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल ( घडसोली मैदान )येथे हॉकी चा सराव जगन्नाथराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुधोजी हायस्कूल संघाने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत पण प्रथमच फलटणच्या इतिहासात प्रथमच१७ वर्षाखालील मुधोजी हायस्कूलच्या महिला संघाने ऐतिहासिक अशी कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवरती आपला ठसा उमटवला आहे.

सातारा जिल्ह्यातील १७ वर्षाखालील महिलांनी हॉकी खेळामध्ये इतिहास रचत पहिल्यांदाच या चषकावर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले व विशेष कौतुकाची बाब म्हणजे संपूर्ण संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.सदर संघ १९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असून तो १६ सप्टेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे रवाना होणार आहे.

मुधोजी हायस्कूल व जूनियर कॉलेज, फलटणचा १७ वर्षाखालील महिला हॉकी संघ दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. ही सातारा जिल्हा व फलटण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या विजयी संघास ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, हॉकी मार्गदर्शक सचिन धुमाळ, क्रीडा शिक्षक खुरंगे बी.बी., धनश्री क्षीरसागर, फिटनेस ट्रेनर ऋषी पवार ,विनय नेरकर,कपिल मोरे ,अथर्व पवार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

या सर्वराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी आमदार दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य महादेवराव माने, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे उपप्राचार्य अण्णासाहेब ननावरे, सोमनाथ माने, पर्यवेक्षक राजेंद्र नाळे, रावसाहेब निंबाळकर, सौ पूजा पाटील व सर्व शिक्षक वृंद व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!