
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि.३ )- इतर मागास बहुजन कल्याण, विभागाकडून शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विदयार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी असलेले विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४ हजार ५००, निर्वाह भत्ता प्रतिमाह सहाशे रुपये, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह दोनशे रुपये, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक २६ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे

