बोर्ड परीक्षेचा राजमार्ग
सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे..
प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज आणि विशेष उपक्रमांच्या समन्वयाचे अनोखे मॉडेल


राजेश क्षीरसागर
फलटण टुडे वृत्तसेवा (कोल्हापूर,दि १२ ऑक्टोबर २०२५):-
शिक्षण मंडळाचे कार्य केवळ परीक्षा आयोजित करणे आणि निकाल देणे या प्रशासकीय चौकटीत अडकलेले असते, या रूढ संकल्पनेला कोल्हापूर विभागीय मंडळाने आव्हान दिले आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी मंडळाने सुरू केलेला ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ हा उपक्रम राज्याच्या शैक्षणिक प्रशासनातील एक अभूतपूर्व, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीचा ठरणारा आहे. ही केवळ एक पुस्तिका नसून, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे महिनानिहाय, सूत्रबद्ध नियोजन देणारी एक समग्र कार्यप्रणाली आहे.

परीक्षा म्हणजे देणारे व घेणारे या दोघांसाठी ताणतणावाचा विषय. कारण यातून दोन्ही घटकांचे मूल्यमापन होणार असते. कोल्हापूर विभागीय मंडळाने आपली भूमिका ‘परीक्षक’ या मर्यादित चौकटीतून बाहेर काढत ‘मार्गदर्शक, समन्वयक आणि नैतिक प्रेरणास्रोत’ अशी सक्रिय भूमिका घेतली आहे. मागील वर्षात ‘कॉपीमुक्त’ परीक्षेचे यशस्वी आयोजन करून आणि निकालात राज्यात कोकणाखालोखाल सातत्याने दुसरे स्थान प्राप्त करून प्रशासकीय उच्च मानके स्थापित केली आहेत. या यशाला केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न ठेवता, त्याला शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांची जोड देण्यासाठीच या नियोजन पुस्तिकेचा जन्म झाला आहे. हे संपूर्ण प्रारूप प्रशासकीय शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक संस्कार या तीन स्तंभांवर आधारित आहे. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने याबाबत नियोजन आराखडा ठरवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

नेतृत्वाचा थेट संवाद आणि भावनिक जोड
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर शाळा प्रमुखांच्या बैठका घेऊन योजनेचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांचे मनोबल वाढवले. विभागीय मंडळाच्या सर्वोच्च नेतृत्वाने शाळा प्रमुखांशी केलेला हा थेट संवाद प्रशासकीय बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
या पुस्तिकेचे अभिनव तत्त्वज्ञान तिच्या प्रेरणादायी आणि भावनिक रचनेत दडलेले आहे.
यश-प्रतीक: मुखपृष्ठावर बोर्डाचे प्रमाणपत्र दाखविणाऱ्या यशस्वी मुलामुलींचे छायाचित्र समाविष्ट करून, ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नपूर्तीचे दृश्यात्मक उद्दिष्ट समोर ठेवते, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनामध्ये एक सकारात्मक स्फुल्लिंग चेतते.
‘नियोजन म्हणजे यशाची वाट’ ही हलकीफुलकी गेय कविता नियोजनाचे महत्त्व अत्यंत सहज, सोप्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषेत पटवून देते.
पुस्तिकेच्या अंतरंगात समाविष्ट केलेली प्रेरणादायी छायाचित्रे, मुख्याध्यापकांना परीक्षा व प्रशासकीय कामकाजाच्या ताणामध्ये सकारात्मक राहून नेतृत्व करण्याची आठवण करून देतात. मंडळाच्या इमारतीचा समावेश संस्थात्मक अस्तित्व आणि जबाबदारीची जाणीव दर्शवतो.
त्रिवेणी नियोजन: अंमलबजावणीची स्पष्टता
या पुस्तिकेतील नियोजनाला त्रिवेणी नियोजन प्रणाली म्हणतात. कारण यात प्रशासकीय काम, शैक्षणिक कार्य आणि विशेष उपक्रम या तीन स्तंभांचे एकाच ठिकाणी महिनानिहाय, सूत्रबद्ध संकलन केलेले आहे.
कामाचे ‘प्रथम सत्र’ (दिवाळीपूर्वी) आणि ‘द्वितीय सत्र’ (दिवाळीनंतर) असे स्पष्ट विभाजन केले आहे. प्रथम सत्रात कामे प्रयत्नपूर्वक पूर्ण करणे अपेक्षित आहे, तर द्वितीय सत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आग्रह आहे.
१. प्रशासकीय कामकाज (अनिवार्य शिस्तीचा आग्रह):
प्रशासकीय काम मंडळाच्या कामकाजाचे अचूक प्रतिबिंब असल्याने ते अनिवार्य ठेवले आहे.
अचूकता आणि वेळेचे बंधन: ऑनलाईन अर्ज भरणे, सप्टेंबरमध्ये आवेदनपत्रे भरण्यापूर्वी ऑनलाईन टेम्प्लेटचा सराव करण्याची सूचना, तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रि-लिस्ट तपासणी व दुरुस्तीवर भर देणे, यातून कामात अचूकता आणली जाते.
कागदपत्रांची पूर्तता: शाळा प्रोफाईल, सांकेतांक नूतनीकरण आणि शिक्षक पॅनेल सादर करणे ही कामे वेळेत पूर्ण करण्याची सक्ती आहे.

ताण व्यवस्थापन: जानेवारीमध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाईन भरणे या प्रक्रिया पूर्ण केल्याने ऐनवेळी बोर्डावर पडणारा ताण कमी होतो.
तंत्रज्ञान व पारदर्शकता: ऑनलाईन प्रक्रियेवर भर देऊन कामात पारदर्शकता आणणे.
२. शैक्षणिक कामकाज (गुणवत्तेच्या दिशेने):
या कामात शाळांना काही अंशी स्वातंत्र्य दिले आहे, परंतु गुणवत्तेचे टप्पे अनिवार्य आहेत.
निदान आणि उपचारात्मक दृष्टिकोन: जून-जुलैमध्ये मागील निकालाचे विश्लेषण करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे आणि प्रथम सत्र परीक्षेनंतर (ऑक्टोबर) तत्काळ उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन सुरू करणे.
गती आणि गुणवत्ता: ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना उजळणीसाठी पुरेसा वेळ मिळेल.
सराव आणि उजळणी: डिसेंबर-जानेवारीमध्ये सराव प्रश्नपत्रिका सोडवणे, पूर्व परीक्षा आयोजित करणे आणि बोर्डाच्या उत्तरपत्रिका लेखनाचा अंतिम सराव करून विद्यार्थ्यांना वेळेचे आणि लेखनाचे व्यवस्थापन शिकवणे.
समावेशकता: रिपीटर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करणे आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे.
३. विशेष उपक्रम (नैतिक आणि मानसिक आधार):
हा स्तंभ मंडळाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
नैतिक क्रांती: ‘कॉपीमुक्ती’ ही सामाजिक जबाबदारी आणि प्रामाणिकपणाचे मूल्य म्हणून रुजवण्यासाठी सप्टेंबरमध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा शपथ’ आणि जानेवारीमध्ये ‘कॉपी मुक्त वातावरणासाठी ग्रामसभा/वॉर्डसभेत माहिती देणे’ यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन शिबिरे (ऑक्टोबर-नोव्हेंबर) अनिवार्य केली आहेत.
सर्वांगीण मार्गदर्शन: करिअर मार्गदर्शन, आहार व आरोग्य शिबिरे आणि ‘सहविचार मंच’ अंतर्गत मार्गदर्शन यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
यशाचे अंतिम सूत्र: कृती आणि जबाबदारी
या संपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. याबाबत विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले “या नियोजन पुस्तिकेत अपेक्षित असलेल्या कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीनंतरच खरे यश अवलंबून आहे.”
ही पुस्तिका म्हणजे यशाचा उत्कृष्ट आराखडा आहे, मात्र तो आराखडा योग्य वेळेत, योग्य पद्धतीने आणि संपूर्ण निष्ठेने अमलात आणण्यावर त्याचे यश अवलंबून आहे. मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी या नियोजनाचे नेतृत्व करणे, शिक्षकांनी निष्ठापूर्वक सहभागी होणे आणि विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कृती करणे, ही या यशाची त्रिसूत्री आहे.
मंडळाने दरमहा पाठपुरावा बैठका आयोजित करण्याची तरतूद ठेवून, अंमलबजावणीतील त्रुटी आणि अडचणी वेळेत दुरुस्त करण्याची यंत्रणा निर्माण केली आहे. तसेच, विभागीय सचिव सुभाष चौगुले म्हणाले”चालू वर्षाच्या अंमलबजावणीनंतर अनुभवाच्या आधारे पुढील वर्षासाठी पुस्तिका अधिक समृद्ध करता येईल,” या सचिवांच्या नमूद केलेल्या दूरदृष्टीमुळे हा उपक्रम तात्पुरता नव्हे, तर सातत्याने सुधारणा करत राहणारी एक प्रक्रिया आहे, हे सिद्ध होते.
कोल्हापूर विभागीय मंडळाचा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ हा उपक्रम कठोर परिश्रम, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रति असलेली बांधिलकी यातून शिक्षणाचा मार्ग केवळ ‘राजमार्ग’ नाही, तर ‘यशाकडे नेणारा, नैतिक मूल्याधिष्ठित आणि आत्मविश्वासपूर्ण महामार्ग’ बनू शकतो, हे सिद्ध करणारा राज्यस्तरावर अनुकरणीय असा आदर्श मॉडेल आहे.

