
फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण दि १६ ऑक्टोबर २०२५):– फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वागेगव्हाण परिसरातील पूरग्रस्त लोकांसाठी नुकतेच मदतकार्य करण्यात आले. निसर्गाच्या कोपामुळे जलमय झालेल्या या भागातील बांधवांसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सर्व स्टाफ यांनी एकत्र येऊन ही मदत मोहीम राबवली.

हे मदतकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक प्रा. सागर पाटोळे, प्रा. चंद्रकांत गोरड, प्रा. आकाश गावडे, आणि प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी ही मदत सामग्री वागेगव्हाण परिसरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या वतीने पूरपीडितांना एकूण ७३ ‘दिवाळी किट्स’चे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये जीवनावश्यक २० वस्तूंचा समावेश होता, ज्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीसाठी मोठा आधार मिळाला.

महाविद्यालयाच्या या सेवाकार्याची फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व नियामक मंडळ सदस्य आणि प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी विद्यार्थी संघटनांच्या या सेवा कार्याबद्दल कौतुक करून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.
या मदतकार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व स्टाफचे महाविद्यालय प्रशासनाने आभार मानले आहेत.


