शिक्षकांनी सकारात्मक असणे काळाची गरज, ताराचंद्र आवळे

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ डिसेंबर २०२५):-विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षक फार महत्त्वाचा आहे. जसा शिक्षक तशी शाळा. शाळा हे सर्वांगीण सुधारण्याचे व विकासाचे साधन असल्यामुळे शिक्षकांनी बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना योग्य दिशेने घडवणे काळाची गरज आहे. प्रत्येक आव्हानाचा सामना ज्याला करता येतो तो जीवनात यशस्वी होतो. यासाठी सकारात्मक वृत्ती फार महत्त्वाची आहे. शिक्षकापुढे अनेक आव्हान आहेत यामध्ये पटसंख्या व शाळा टिकवणे हे फार मोठे आव्हान आहे या आव्हानाचा सामना करताना शिक्षकांनी सकारात्मक असणे काळाची गरज आहे असे मत समुपदेशक,ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण येथे आयोजित केलेल्या केंद्रीय शिक्षण परिषदचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी केंद्रप्रमुख दादासाहेब रणवरे, केंद्र संचालक सचिनदेव चौगुले,सहाय्यक उमेश पिसाळ, विषयतज्ञ नंदू कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात अभ्यासक्रमातही बदल होत आहे या बदलांचा स्वीकार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे ज्ञान देऊन त्यांना घडवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर योग्य कामासाठी करा समाजामध्ये अफवा पसरवणे किंवा अन्य कारणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे घातक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल वापरणे गरजेचे असले तरी त्याचा किती व कसा वापर करावा याकडे आपला कटाक्ष असला पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक जानेवारी ते 4 जानेवारी यादरम्यान शाहू स्टेडियम सातारा येथे संपन्न होत आहे तरी या संमेलनासाठी सर्वांनी उपस्थित राहून सारस्वतांच्या मेळ्यामध्ये सहभागी व्हावे व हे संमेलन यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख दादासाहेब रणवरे, सचिनदेव चौगुले तसेच तज्ञ मार्गदर्शक नंदू कोकरे,, अमोल भिसे, राजेंद्र कदम,पुनम बोंद्रे, सुनीती कवितके व उमेश पिसाळ यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा व इतर सर्व उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार अनोख्या पद्धतीने बुके ऐवजी बुक/ पुस्तके भेट देऊन करण्यात आला. हा आगळावेगळा असा सर्वांचा सत्कार पहिल्यांदाच झाल्यामुळे सर्वांना समाधान वाटले त्यामुळे वाचन संस्कृती वाढीस लागेल असा सूर उमटला . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सोळंकी यांनी केले तर आभार अमोल जाधव यांनी मानले. यावेळी साखरवाडी केंद्रातील 25 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी विद्या जमदाडे, अर्चना सोनवलकर, शाहीन हन्नुरे, अमोल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!