नाईक निंबाळकर संस्थानच्या सांस्कृतिक वारशाचा भव्य सोहळा

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि १० एप्रिल २०२६): भारतीय शास्त्रीय संगीत ही आपल्या देशाची जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. मात्र, काळाच्या ओघात योग्य प्रचार आणि प्रसाराच्या अभावामुळे पारंपरिक संगीत आणि नव्या पिढीमध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर फलटणच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाची जपणूक करण्यासाठी ‘फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याने साहित्य, क्रीडा आणि कलांना पूर्वीपासूनच प्रोत्साहन दिले असून, त्यामुळे या परिसरात व्यासंगी आणि दर्दी रसिकांची परंपरा निर्माण झाली आहे. शहर आणि परिसर शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना समाजाची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कारमूल्ये जपणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
याच उद्देशाने कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्या पुढाकारातून २०२० पासून ‘फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव’ सुरू करण्यात आला. या उपक्रमाला फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत विचारांच्या टीमचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, हा महोत्सव आता फलटण शहराची ओळख बनत आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून आतापर्यंत सावनी शेंडे, पौर्णिमा धुमाळे, प्रमोद मराठे, अमर ओक, श्रुती भावे यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपल्या कला सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत. पारंपरिक संगीत नव्या पिढीसाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीने सादर केल्यामुळे रसिकांचा प्रतिसादही दिवसेंदिवस वाढत आहे.
यावर्षीचा महोत्सव दिनांक १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा “जादूची पेटी” हा कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सनई वादक केदार जाधव यांचेही सादरीकरण होणार आहे.

याशिवाय युवा कलाकार रसिका वैशंपायन आणि रिअॅलिटी शोमधून नाव कमावलेल्या प्रियांका चौधरी-ढेरंगे यांचे गायन, तसेच निवेदिता व नंदिता देशपांडे यांचे कथक नृत्य हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून, जोशी हॉस्पिटल्स, अग्रोकेम फाउंडेशन, आय. आय. केअर फाउंडेशन, मॅग्नेशिया केमिकल्स, अरिस्टा केमिकल्स, अरिहंत ऑटोझोन, युनिटी डेव्हलपर्स आणि शांतीकाका सराफ अँड सन्स यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या “खुर्ची प्रवेशिका” जोशी हॉस्पिटल्स, अरिहंत ऑटोझोन (TVS शोरूम), शांतीकाका सराफ (रिंग रोड) आणि सरस्वती संगीत अकादमी येथे उपलब्ध आहेत.

दरम्यान, या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. अरविंद निकम (प्रशासन अधिकारी – फ. ए. सो.), श्री प्रमोद निंबाळकर, प्रा. वसंत शेडगे (प्राचार्य – मुधोजी हायस्कूल) आणि भाग्यश्री गोसावी (संस्थापिका – कला प्रसारक संस्था) हे प्रमुख उपस्थित होते.
महोत्सवातील सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता वेळेत सुरू होणार असल्याने रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.📞 संपर्कासाठी : 9405746419 / 9225525352



