जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्यासह २० टक्के अतिरिक्त राखीव कर्मचाऱ्यांचा सहभाग
फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि १३ ऑक्टोबर २०२६) : – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व १३७ मतदान केंद्रांवरील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्यासह २० टक्के अतिरिक्त राखीव कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) आणि सर्व तहसीलदार उपस्थित होते.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया नियमबद्ध, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान पथकांना सविस्तर मार्गदर्शन आले.
प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये, मतदान साहित्याची तपासणी, मतदान केंद्राची उभारणी, मतदारांची ओळख पडताळणी, पक्की शाई लावण्याची पद्धत, मतपत्रिका हाताळणी आणि मतदानाची गोपनीयता राखण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम कसा नोंदवावा, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती व प्रवेश, विशेष परिस्थितीतील कार्यवाही आणि मतदान संपल्यानंतर साहित्य जमा करण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे मतदान एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही मतदारसंघांच्या मतपत्रिका, मतदार याद्या आणि मतदान साहित्य स्वतंत्र ठेवण्याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना प्रशिक्षणात देण्यात आल्या. पदवीधर मतदारसंघासाठी पांढरी, तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी मतपत्रिका वापरण्यात येणार आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी पक्की शाई वेगवेगळ्या बोटांवर लावण्याची कार्यपद्धतीही समजावून सांगण्यात आली.
मतदानाची गोपनीयता, निवडणूक नियमांचे काटेकोर पालन, निष्पक्षता आणि मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची योग्य नोंद ठेवण्यावर भर देण्यात आला. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणे आणि निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कामकाज पूर्ण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मतदान पथकांनी प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे पालन करून आपापल्या जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडाव्यात, यावर भर देण्यात आला.
