फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १३ २०२६):- फलटण शहरातील अग्रगण्य व परंपरा जपणाऱ्या ‘नवरात्र महोत्सव मंडळ, शंकर मार्केट रोड, ( भानूची देवी )फलटण’ यांच्या वतीने यंदा नवरात्रोत्सवाचे दिमाखदार ५६ वे वर्ष मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरे केले जात आहे. ५६ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या महोत्सवात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या माळेला श्री तुळजाभवानी देवीचे ‘झोपाळ्यात बसलेली देवी’ या देखण्या रूपात मनमोहक पूजन व शृंगार करण्यात आला आहे.
शंकर मार्केट रोड नवरात्र उत्सव मंडळ हे दरवर्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण, धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी संपूर्ण फलटण शहरात प्रसिद्ध आहे.

यंदाच्या ५६ व्या वर्षाच्या निमित्ताने मंडळातर्फे विविध धार्मिक विधी, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या माळेनिमित्त देवीची झोपाळ्यातील आकर्षक आरास पाहण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी शंकर मार्केट परिसर तसेच शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवाच्या या पावन पर्वावर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवीचे दर्शन घ्यावे आणि आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शंकर मार्केट रोड नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

