स्वतःची १२५ हेक्टर जमीन मोफत देवून पाडेगाव ऊस संशोधन व बियाणे उत्पादन केंद्र उभारणी

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब शेती व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा राजा

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २४)ः –

फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी संस्थानातील रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्यामध्ये प्रामुख्याने शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पाडेगाव, ता. फलटण येथे स्वतःची १२५.५१ हेक्टर जमीन देवून त्यावर ऊस संशोधन व ऊस बियाणे निर्मिती केंद्र स्थापन करुन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविली.


सन १२८४ पासुन अस्तित्वात असलेल्या फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी फलटण संस्थान मधील कायम दुष्काळ प्रवण प्रदेशातील जमिनींना पाटाचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे यासाठी सन १९२७ मध्ये निर्माण झालेल्या भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी फलटण संस्थानातील अनेक गावांना मिळवुन दिले, त्यामुळे संस्थानातील २५ टक्के पेक्षा अधिक शेतजमिनी बागायती बनल्या व फलटण संस्थानामध्ये ऊस शेतीचे क्षेत्र वाढु लागले. त्या ऊस शेतीस चांगले बियाणे पुरविण्याच्या हेतुने पाडेगाव येथील स्वतःच्या १२५.५१ हेक्टर क्षेत्रावर ऊस बियाणे उत्पादन केंद्र फलटण संस्थानांतर्गत सुरु केले व शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बियाणे उपलब्ध करुन देवून अधिक क्षेत्रावर ऊस शेती करण्याचे आवाहन केले, उपलब्ध ऊसाचे गाळप व शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळण्यासाठी त्यांनी श्रीमान शेठ मफतलाल व लक्ष्मणराव आपटे यांच्याशी वाटाघाटी करुन व सवलत देऊन, मदत करुन सन १९३३ साली आपल्या संस्थानात साखरवाडी येथे फलटण शुगर वर्क्स लिमिटेड या नावाचा साखर कारखाना उभा करुन घेतला, त्यानंतर १९५४ साली श्रीराम सहकारी साखर कारखाना, नंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व इतर सहकारी साखर कारखाने काढण्यास देखील श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी मदत केली. सोमेश्वर कारखान्याचे ते स्वतः संस्थापक चेअरमन होते.


साहजिकच सहकारी व खाजगी साखर कारखाने उभे राहिल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना ऊसाला समाधानकारक दर मिळू लागला, परिणामी ऊस लागवडी आणि अधिक ऊस ऊत्पादनास प्राधान्य मिळु लागले.
भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर असल्यामुळे ऊस पिकावर विविध प्रकारचे संशोधन करुन अधिक उत्पादन देणारे ऊसाचे वाण निर्माण करण्यासाठी सन
१८९० मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, मांजरी येथे स्थापन करण्यात आले होते, तदनंतर या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्यासाठी व चांगले वाण निर्मितीसाठी सन १९३२ मध्ये ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे स्थलांतरीत करण्यात आले. सातारा प्रांतातील फलटणचे
तत्कालिन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी पाडेगाव येथे १२५.५१ हेक्टर जमिन ऊस संशोधन केंद्रास दिली होती, त्याक्षेत्रावर आजही हे ऊस संशोधन व अधिक उत्पादन देणारे वाण निर्मिती केंद्र म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे कार्यान्वित आहे.
फलटण संस्थानचे तत्कालीन अधिपती श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर राजेसाहेब यांनी दूरदृष्टीने या जिरायती पट्ट्यात पाटाचे पाणी, पाडेगाव ऊस संशोधन व बियाणे उत्पादन केंद्र आणि साखर कारखानदारी उभी केल्याने आज हा संपूर्ण पट्टा किंबहुना नीरा खोरे सुजलाम सुफलाम झाले आहे.
१२५.५१ हेक्टर क्षेत्रावर उभे राहिलेले मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चा लाभ केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला होत आहे असे उल्लेखनिय कार्य श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी केले आहे.
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास दि. २७ जुलै १९५२ रोजीच्या फेरफार नंबर १९२६ नुसार सदर जमीन फलटण सरकारने मुंबई राज्य सरकारला दिली तर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर राज्य शासनाच्या शेती खात्याने सदर जमीन पाडेगाव फार्मच्या नावे केल्याचे महसुली कागद पत्रावरुन स्पष्ट होते.
श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी आपल्या संस्थानातील रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, ऊस उत्पादनाला प्रोत्साहन आणि ऊस गाळपासाठी सहकारी व खाजगी साखर कारखानदारीची उभारणी केली, त्याबरोबर आपल्या संस्थानात सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. संस्थानात सहकारी पतपेढी व सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. १९१८ साली दि फलटण बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली, तसेच १९२६ साली श्री लक्ष्मी सेंट्रल को – ऑप. बँक स्थापन केली. सहकारी संस्थांमुळे संस्थानातील शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यांना पतपुरवठा होऊ लागला, समृध्दी वाढली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!