फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) : –
सर्वांना माहितीच आहे की पाणी हे जीवन आहे. आपण स्वतःला शेतीप्रधान देश म्हणवतो. आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे ही लाजीरवाणी गोष्ट नाही का ? आज इस्रायल सारख्या छोट्या देशात आपल्या 10 टक्के पाऊस पडतो तरीही तिथे ते नंदनवन करू शकतात याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management (वॉटर मॅनेजमेंट) हा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा नळातून पडलेले पाणी हे जवळपास सात वेळा Recycle (रिसायकल) व Reuse (रियूज) होऊनच शेवटी जमिनीवर पडतं हे आपण अमलात का आणू शकत नाही? आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय उद्या भविष्यात पृथ्वीवर कुठे पिण्यासाठी पाणी सापडतय का हे शोधण्यासाठी यान सोडावा लागेल. पाणी हे राष्ट्राची संपत्ती आहे ती वाचवायलाच हवी. पाऊस पडायला आज चार दिवस उशीर झाला तरी सगळ्यांची हवा टाईट होते ही परिस्थिती पण आपल्या हाताने येऊ घालत आहे. तेव्हा आता तरी सावध व्हा पाण्याचे स्त्रोत वाचवा वृक्षारोपण ही काळाची गरज आहे स्वतःवरचे पाणी विहीर व बोरवेल मध्ये सोडून त्याची साठवणूक करा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा.
सध्याच्या वृक्षतोडीच्या काळामध्ये जंगले तोडून तसेच यामुळे पर्जन्यमान कमी होऊन पाण्याचे स्तोत्र नष्ट करून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची जंगले आपण निर्माण करीत आहोत. जगामध्ये अनेक उद्योग धंद्यातून सोडणारा धूर यामुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढून पर्जन्यमान व स्वच्छ हवेचे प्रमाण कमी होत आहे. याचाच भयंकर प्रतिकूल परिणाम म्हणजे जागतिक तापमान वाढून ते 50 अंश पार करून गेलेले आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडून काही ठिकाणी उष्माघातामुळे जीवित हानी होत आहे. काही ठिकाणी पाऊस पडला तर भरपूर अगदी ढगफुटी सारखा पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडत नाही. निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. भविष्यामध्ये तर पाणी यावयाचे बंद होईल हे खरे होऊ शकते. यावर एकच उपाय तो म्हणजे निसर्गातील जल स्तोत्र वाचवून निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष वाढ करण्यासाठी वृक्षारोपण करणे व पाणी वाचवणे ही काळाची गरज बनलेली आहे.
आपणही याचा विचार करून निसर्गातील जलस्तोत्र पाणी व वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न कराल अशी आशा आहे.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे की, पाणी वाचवण्याबद्दलचा माझा अनुभव मी खालील प्रमाणे आपणाला कथन करीत आहे.
मी एके दिवशी शनिवारी श्री क्षेत्र कन्हेरी, ता. बारामती, जि पुणे येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मारुतीरायाच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन घेतल्यानंतर सहजच फिरत असताना तेथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांच्या एका जाहिरातीतील *तहानलेल्या विहिरीला छतावरचे पाऊसपाणी पाजले….. उन्हाळ्यातल्या गरजेला पुरून उरले…* ह्या जनहितार्थ भिंतीवर पेंटिंग केलेल्या बोर्डवरील मजकुरावर माझे लक्ष गेले आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अनावसाये माझे सणसर,ता. इंदापूर येथील घरी एक 200 फूट खोलीचे 6 इंची बोरवेल घेतलेले आहे. या बोरवेलला पाषाण लागून सुमारे 170 फुटावर पाणी लागले आहे . उन्हाळ्यात एप्रिल, मे मध्ये बोअर वरील मोटर कमी पाणी मारते व काही वेळाने बोरवेल बंद पडते . मला पाणी कमी पडते. मला हा बोर्ड वाचून एक आयडिया सुचली. माझेही नुकतेच स्लॅब चे दोन मजली बांधकाम चालू होते. अगोदरच स्लॅबला उतार देऊन एका ठिकाणी दहा बाय चार व एक फूट खोलीचा टॅंक अगोदरच तयार करून ठेवलेला होता. मी विचार केला की आपणही आपल्या छतावरील पावसाचे पाणी जर आपल्या बोअरमध्ये उतरवले तर आपल्यालाही उन्हाळा जाणवणार नाही व पाण्याची कसलीही कमतरता भासणार नाही. त्याप्रमाणे मी लागलीच माझे काम चालू असल्याने घराच्या छतावरील टॅंक मधून एक पाईप काढला व तो पाईप बोरवेल मध्ये सोडला. आता पाऊस झाला की छतावरील पाणी आटोमॅटिक बोअर मध्ये येते. बोअरवेलमध्ये पाणी साचून माझी पाण्याबाबतची मोठी समस्या दूर झाली व माझी पाण्याच्या निकडीची गरज भागली.
आपणही आपल्या रानातील विहिरीमध्ये /बोअरवेलमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्या घराच्या छतावरील वाया जाणारे पावसाचे पाणी सोडावे म्हणजे पुढील उन्हाळा तसेच विहिरीला किंवा बोअरला पाणी कधीच कमी पडणार नाही व निसर्गनिर्मित पाण्याचे जलस्तोत्र वाचून पाण्याच्या भूजल साठ्यामध्ये वाढ होईल.
अशी माहिती महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ गुणवंत कामगार पुरस्कार विजेते
प्रकाश ज्ञानदेव शिंदे
मी.पो.सणसर,ता. इंदापूर,जि.पुणे
मो.नं. 9657220101
यांनी दिली आहे.