फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
नीट 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पहिल्यांदाच मार्कांचा अक्षरशः पाऊस पडला त्यामुळे विद्यार्थी पालकांनी गोंधळून न जाता प्रथम प्रवेश प्रक्रियेचे सखोल ज्ञान मिळवणे आवश्यक आहे असे मत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी व्यक्त केले
सेंटर फॉर करिअर गायडन्स आणि सर्विस इंजिनियर्स फोरम बारामती तर्फे “नीट-२०२४ मेडिकल प्रवेश प्रक्रिया” बाबत एक दिवशीय कार्यशाळा बारामती मध्ये संपन्न झाली.
कार्यशाळेत बारामती सोलापूर पुणे सातारा नाशिक अहमदनगर सह राज्याच्या विविध भागातील दीडशे विद्यार्थी पालकांनी लाभ घेतला. याप्रसंगी इंजिनीअर्स फोरमचे अध्यक्ष इंजि. अजित जमदाडे तसेच दीपक पांढरे, प्रदीप कुलकर्णी, उद्धव मोरे, बबनराव करे यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
देशभरातील नव्हे तर जगभरातील सर्वात मोठी परीक्षा आणि एमपीएससी यूपीएससी पेक्षाही आत्ता जास्त महत्त्व आलेल्या परीक्षेमध्ये पेपर फुटी प्रकरण, ग्रेसमार्क प्रकरण, पहिल्यांदाच 67 विद्यार्थ्यांना 720 मार्क, आठ विद्यार्थी एकाच केंद्रावरील टॉपर यामुळे हे प्रकरण जास्त गाजू नये म्हणून देशाचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले असताना, नियोजित निकालाची 14 जून तारीख असताना, घाईघाईत अन्सर की जाहीर करून दुसऱ्याच दिवशी 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता निकाल लावला.
आता मात्र देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळला आहे. प्रथमच देण्यात आलेली 418 किंवा 419 गुण मिळतातच कसे याबाबत आवाज उठवल्यानंतर दिलेले ग्रेसमार्कचे कारण तसेच मागील आठ वर्ष निकालानंतरच्या जाहीर करण्यात येणाऱ्या प्रेस नोट मध्ये देशपातळीवरील व राज्यस्तरीय टॉपर विद्यार्थ्यांचे मार्क्स देत होते. यंदा ग्रेस मार्क प्रकरण झाकण्यासाठी यंदा मार्कच न देता फक्त परसेंटाइल दिले.
**महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे**
मागील वर्षीच्या तुलनेत देशभरात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची सुमारे तीन लाख वाढ झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र फक्त 1638 विद्यार्थ्यांची वाढ झाली असून देशभरात 56.41% विद्यार्थी पात्र असले तरी राज्यातील पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी मात्र 51.75 टक्के आहे ही जमेची बाजू आहे.
यंदा कट ऑफ मार्क्स हे वाढणारच आहेत परंतु राज्यातील कोणताही प्रवेश हा ऑल इंडिया रँक वर नसून प्रवेशासाठी राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या राज्यातील मेरिट क्रमांक वर अवलंबून असतो. यंदा राज्यातून प्रवेशासाठी सुमारे 65 ते 70 हजार विद्यार्थी नाव नोंदणी करतील. त्यानंतर आपणास राज्यातील मेरिट क्रमांक मिळेल. यंदा सुमारे खुल्या गटासाठी एमबीबीएस शासकीय 3400 तर खाजगी 8000 पर्यंत तसेच बीएएमएस शासकीय साठी सुमारे 11हजार तर खाजगी प्रवेश 22 हजार मेरिट क्रमांक पर्यंत प्रवेश मिळू शकेल असा अंदाज आहे. अर्थातच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश किती रिपीटर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत भाग त्यावर अवलंबून असतो थोडक्यात आपल्याला शासकीय एमबीबीएस प्रवेश मिळत नसेल तर प्लॅन बी म्हणून इतर कोर्सचा शासकीय खाजगी तसेच अभिमत विद्यापीठांमधील प्रवेशाचा सुद्धा विचार करणे अत्यंत गरजेचे असल्याचे हेमचंद्र शिंदे यांनी सांगितले.