फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
एक एप्रिल 2024 पासून महावितरणने पुन्हा वीजदरवाढ लागू करून उद्योगांना चांगलाच झटका दिला आहे. मुळातच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे सर्वाधिक दर आहेत यात कपात करण्याऐवजी राज्यातील विजेचे दर कमी अधिक प्रमाणात वेळोवेळी वाढवले जात आहेत. त्यामुळे उत्पादनांचा खर्च वाढत चालला असून महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यांच्या तुलनेत व्यवसायिक स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल याची चिंता असून महावितरणने लादलेली नवीन वीजवाढ त्वरित मागे घेऊन राज्यातील उद्योगांना दिलासा द्यावा अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी महावितरणच्या प्रशासनाकडे केली आहे. महावितरणने नुकतीच लागू केलेल्या नवीन वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी व दरवाढ मागे घेण्यासाठी महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन च्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.
बारामती इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष धनंजय जामदार,उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंभीरशाह शेख वकील, सदस्य महादेव गायकवाड,चंद्रकांत नलावडे, हरिश्चंद्र खाडे, विष्णू दाभाडे, सूर्यकांत रेड्डी, राजन नायर,दीपक नवले, अजित सस्ते, नितीन आटोळे, सूर्यकांत माळवे, माधव खांडेकर , निलेश खोमणे,रवींद्र रायते , विशाल देशमुख आदींचा समावेश होता.
धनंजय जामदार पुढे म्हणाले महावितरणने वीज गळती, वीज चोरी बरोबरच भ्रष्टाचारास आळा घालत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे प्रभावी व्यवस्थापन करून काटकसरीचे धोरण राबवणे आवश्यक आहे. वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे, खाजगी वीज प्रकल्पातून कमीत कमी दराने वीज खरेदी करणे तसेच सौर ऊर्जा, रूफ स्टॉप सौर प्रकल्प व पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. अशा बाबी अमलात आणल्या तर मोठी आर्थिक बचत होऊ शकते व सारखी सारखी वीजदरवाढ करण्याची वेळ महावितरणवर येणार नाही असे आमचे मत आहे.
वीस दरवाढीबाबत बारामतीच्या उद्योजकांच्या तीव्र भावना असून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशननेचे निवेदन शासनाकडे त्वरित पाठवण्यात येईल अशी ग्वाही महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिली.