“निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम” प्रसंगी मार्गदर्शन करताना वैभवी भोसले व उपस्थित इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ) :-
प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनीच्या लॉ कॉलेज फलटण येथे महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या मार्गदर्शनाखाली प्री-लॉ प्रथम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत “निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम” आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात विशेष अतिथी मार्गदर्शक म्हणून फलटण निर्भया पथकाच्या प्रमुख मा.वैभवी भोसले उपस्थित होत्या. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अमित मोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी विचारमंचावर पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे, मा.राणी कुदळे मॅडम, श्री.कोळेकर सर, प्रा.ॲड.शिरीन शाह, सौ.श्रेया निंबाळकर मॅडम उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले यांनी निर्भया पथकाच्या स्थापनेमागील इतिहास सांगितला व निर्भया पथकाचे संपूर्ण भारतभर काम चालू असून सातारा जिल्ह्यात सात टीम कार्यरत असल्याची माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब तसेच फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. राहुल धस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली टीम महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी काम करीत आहे असे त्या म्हणाल्या. एखादा छोटा भासणारा वाईट प्रसंग देखील मुलींच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
कायद्याची साथ महिलांना असल्याचे सांगून मुलींनी कायद्याचा सदुपयोग करून त्यायोगे स्वतःचे व समाजाचे संरक्षण करावे; तसेच स्वतः समाजाचे पोलीस व्हावे व स्वतःसह सर्वांची जबाबदारी घ्यावी असे आवाहन विद्यार्थिनींना केले.
सोशल मीडिया वापरण्यापूर्वी महाविद्यालयीन मुला-मुलींनी कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. कॉन्स्टेबल भोसले पुढे म्हणाल्या, समाज माध्यमांचा विवेकी वापर करताना स्वतःच्या व स्वतःच्या आप्तेष्टांच्या खासगीपणाचा (प्रायव्हसी) आदर करावा. किशोरवयातून तरुण वयात प्रवेश करत असताना शरीरातील नैसर्गिक बदल व्यवस्थित हाताळले पाहिजेत. हे निसर्गचक्र सुलभरीत्या हाताळले गेले नाही तर गुन्हेगारी वाढते. गुन्हेगारी नंतर उपाययोजना करण्यापेक्षा तत्पूर्वीच प्रबोधन करणे केव्हाही लाभदायक ठरते. या उद्देशानेच निर्भया पथक कार्यरत आहे. याप्रसंगी भोसले मॅडम यांनी निर्भया पथक फलटण विभागाचा 73872 41091 हा संपर्क क्रमांक योग्यवेळी वापरण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले. त्यासोबतच 100, 112 व 1091 या संपर्क क्रमांकावर मदत मागितल्यास दहा मिनिटाच्या आत तुमच्यापर्यंत मदत पोहोचेल अशी ग्वाही दिली. पीडित महिलेने मदत मिळवण्यासाठी या संपर्क क्रमांकाचा वापर केल्यास सदर व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते अशीही माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे व विशेषतः प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले. अशा निर्भया पथकाच्या कार्यक्रमांची व मार्गदर्शनाची सर्व समाजास गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. नारी शक्तीचा गौरव करताना सर्व आघाड्यांवर स्त्रियांना संघर्ष करावा लागतो यावर त्यांनी बोट ठेवले. सर्व अडचणींवर मात करणारी अष्टपैलू स्त्रीच असू शकते असे सांगून स्त्रीत्व हे वरदान असल्याचे सांगितले.
“आहेस निर्भया तू
अवतार दुर्गेचा
नको घाबरु कोणाला
येऊ तुझ्या हाकेला”
या निर्भया पथकाच्या घोषवाक्याने त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
तत्पूर्वीच प्रा.श्रेयस कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या इतिहासाचा थोडक्यात परामर्श घेतला. भारतीय स्त्रीवादी चळवळीच्या प्रवासाचे वर्णन करताना मनुस्मृतीच्या जोखडातून भारतीय स्त्रियांना बाहेर काढण्याचे काम राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय, ‘समाजस्वास्थ्य’कार र. धों. कर्वे, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान स्त्री – पुरुषांनी केल्याचे त्यांनी मत मांडले.
विधी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थी – विद्यार्थिनींनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. प्री-लॉ प्रथम वर्षात शिकत असलेल्या कु.ऐश्वर्या बनसोडे या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘अष्टपुत्र सौभाग्यवती’ असा आशीर्वाद देण्याऐवजी ‘तुझ्या पोटी एक गोंडस मुलगी जन्मास यावी’ असा आशीर्वाद का देऊ नये, असा सवाल उपस्थित केला. याप्रसंगी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले श्री.शीतल अहिवळे, कु.नुझर शेख तसेच प्रथम वर्षात शिकत असलेल्या विशाल भोसले या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते उस्फूर्तपणे व्यक्त केली. कु.सबिया शेख व रणजीत शेळके यांनी आपल्या स्वरचित कवितांच्या माध्यमातून आपल्या स्त्रीवादी भावनांना वाट करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विधी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य प्रा.ॲड.अमित मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विधी महाविद्यालयास विद्यार्थिनींनी कशाप्रकारे गौरवशाली परंपरा तयार करून दिली आहे याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या मेरिट लिस्ट मध्ये सातत्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी येत असतात, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनी या मातृसंस्थेच्या घटनेत महिला उत्थान हे स्वप्न बाळगून बॅरिस्टर राजाभाऊ भोंसले यांनी विधी महाविद्यालयाची स्थापना केली असल्याचे संदर्भ सापडतात. वरकरणी सुशिक्षित दिसणारी व्यक्ती कायद्याच्या बाबतीत जागरूक असेलच असे नाही; त्यामुळे कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कायद्याची माहिती सर्वच सामान्यजणांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
प्री-लॉ प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी कु.रिया मिसाळ व कु.गायत्री गावडे यांनी कार्यक्रमाचे काव्यमय सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ॲड.अमित मोरे यांनी पाहुण्यांचा पुष्प रोपटे व गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार केला. कु.दीक्षा करडे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी, प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.