फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ) :-
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज मुंबई शहरात शिवाजी पार्क येथे खो खो स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत खुल्या गटात महिलांमध्ये शिवनेरी सेवा मंडळाला तर पुरुषांमध्ये एम. पी. एल. ला विजेतेपद व मुलींचे विजेतेपद शिवनेरीला तर कुमारांचे विजेतेपद ओम साईश्वरला मिळाले. मुबई उपनगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत जवळ जवळ २५० खेळाडूंनी २४ गटांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
मुंबई खो-खो
खुल्या गटात महिलांमध्ये शिवनेरी सेवा मंडळाने अमरहिंद मंडळाचा ५-३ (मध्यंतर ५-१) असा एक डाव २ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात शिवनेरीच्या आरुषी गुप्ता ( ३.५० व ४ मि. संरक्षण) व मुस्कान शेखने (दोन्ही डावात नाबाद राहत ३.१०, २.२० मि. संरक्षण) धमाकेदार संरक्षणाची खेळी करत अमरहिंदच्या तोंडाला फेस आणला तर कशिश पाटेकर (३ गुण) यांनी सामन्यात निर्णायक खेळी करत जोरदार जल्लोष करत विजय साजरा केला. तर पराभूत अमरहिंद मंडळाच्या प्रांजळ पाताडे (१.२० मि. संरक्षण), रुद्रा नाटेकर व रिद्धी कबीर (प्रत्येकी १.१० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
पुरुषांच्या सामन्यात एम. पी. एल. संघाने एस. पी. एल. संघाला ९-७ असे एक डाव २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात एम. पी. एल. च्या वेदांत देसाई (१.४०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), जनार्दन सावंत (१.४०, २.१० मि. संरक्षण) हितेश आंग्रे (१.५० मि. संरक्षण व ३ गुण), शुभम शिंदे (१.१०, १.४० मि. संरक्षण व १ गुण), ओमकार मिरगळ (२ गुण) यांनी खेळ दमदार खेळ करत विजय साजरा केला. तर पराभूत एस. पी. एल.च्या प्रतिक राज (१.२० मि. संरक्षण) व पवन नाचणकर (१.१० मि. संरक्षण व १ गुण) हे जोरदार खेळी करण्यात अपयशी ठरले.
मुलींच्या (१७ वर्षाखालील) अंतिम सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने ओम साईश्वर सेवा मंडळाचा ३-१ असा २ गुणांनी पराभव केला. शिवनेरीच्या मुस्कान शेख (नाबाद ५ मि. संरक्षण), सिद्धी शिंदे (३.२० मि. संरक्षण) व आरुषी गुप्ता (नाबाद १.४० मि. संरक्षण) यांनी तर ओम साईश्वरच्या निर्मिती परब (४.३०, ३.१० मि. संरक्षण) काजल परब (नाबाद १.५० मि. संरक्षण व १ गुण) यांना पराभव टाळता आला नाही.
मुलांच्या (१७ वर्षाखालील) अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्या. मंदिराचा ९-५ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम साईश्वरच्या साई टेम्बुलकर (४ मि. संरक्षण), सार्थक माड्ये (२.३० मि. संरक्षण व २ गुण), राजेश मंडल (२ मि. संरक्षण) यांनी विजश्री खेचून आणली तर पराभूत श्री समर्थच्या अनिश शिरोडकर (२.२० मि. संरक्षण), देवर्ष पानगले व अथर्व खोचाडे (प्रत्येकी १.२० मि. संरक्षण व १ गुण) विहंग पाटील (१.३० मि. संरक्षण) यांनी परभवात चांगली कामगिरी केली.
कुस्ती
कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील ३३ किलो वजनी मुलींच्या गटात संस्कृती शिंदेने निशांत खान हिला पराभूत करत तर मुलांचा ३५ किलो वजनी गटात सुनील सागरने सुजित दिडवाघला पराभूत केले व गट विजेते ठरले.
१७ वर्षाखालील ४० किलो वजनी मुलींच्या गटात कविता राजभरने श्रेय थोरालला तर मुलांचा ४५ किलो वजनी गटात अथर्व पवारने राज दिडवाघला पराभूत केले व गट विजेते ठरले.