फलटण टुडे वृत्तसेवा : –
अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविदयालय, आयुर्वेदीक महाविद्यालयापाठोपाठ आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालयही सुरु होणार आहे. बारामतीकरांसाठी ही खूषखबर आहे. राज्यमंत्रीमंडळाने बुधवारी (दि. 14) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या मुळे आता बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
गेल्या काही वर्षात बारामती मेडीकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून दररोज किमान सातशे रुग्ण येथे औषधोपचार घेतात. आयुर्वेदीक महाविद्यालयाची दुसरी बँच यंदापासून बारामतीत येणार आहे. येत्या वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आहेत.
बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणे महत्वाचे ठरणार आहे. कोविडपश्चात राज्यातील वैदयकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.
त्या मध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैदयकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणीचाही प्रस्ताव होता. त्या नुसार सहा ठिकाणी या महाविद्यालयांना मान्यता दिली गेली आहे. लवकरच या बाबतचा अध्यादेश जारी होऊन पुढील प्रक्रीया सुरु होणार आहे.