पुणे विभागीय जीएसटी समितीवर बारामतीचे धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांची निवड..

धनंजय जामदार, सुशील सोमाणी ,निलेश दोशी

फलटण टुडे (बारामती वृत्तसेवा ):-
वस्तू व सेवाकर विभागाच्या पुणे विभागांतर्गत ग्रीव्हन्स रेडरेसल कमिटी वर (Grievance Redressal Committee Pune Zone) सदस्य म्हणून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी व बारामती मर्चंट असोसिएशनचे सचिव निलेश दोशी यांची निवड करण्यात आलेली असलेचे केंद्रीय जीएसटीचे सह आयुक्त ध्रुव मंडलम शेषाद्री यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

केंद्रीय वस्तू व सेवाकर पुणेचे मुख्य आयुक्त मयांक कुमार व राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करण्यात आली असून बारामतीतील धनंजय जामदार, सुशील कुमार सोमाणी व निलेश दोषी यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर येथील उद्योग प्रतिनिधी, पुणे विभागातील चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टीशनर्स, कंपनी सेक्रेटरी, कस्टम हाऊस, खाद्यतेल व्यापारी महासंघ, टाटा मोटर्स आदींचे प्रतिनिधीं व जीएसटी विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आलेला आहे. केंद्रीय जीएसटी अंतर्गत पुणे -१ , पुणे – २ व कोल्हापूर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र या समितीच्या कार्यकक्षात असणार आहे.

जीएसटी करदात्यांचे सर्व प्रश्नांचा अभ्यास करुन ते सोडवणे, प्रक्रियेतील अडथळे व सॉफ्टवेयर संबंधी विशिष्ठ अथवा सार्वत्रिक समस्यांचे निवारण, जीएसटी करदात्यांना जाचक ठरणारे कायदे, नियमअटी, परिपत्रके बाबत जीएसटी कौन्सिल सचिवालय व सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसच्या धोरण विभागाच्या निदर्शनास आणून त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे आदी महत्वाचे कामकाज ही विभागीय समिती करणार आहे.

२०१७ साली जीएसटी लागू केल्यापासून आजतागायत ही करप्रणाली व तिच्या अंमलबजावणी बाबत अनेक समस्या व संभ्रम असून करदात्यांना योग्य मार्गदर्शन करन त्यात सुलभता आणणे आवश्यक असलेने बारामती परिसरातील जीएसटी करदात्यांनी आपले प्रश्न व सूचना अवश्य कळवावेत, ते सोडवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आवाहन धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!