क्रीडा दिन साजरा करताना सर्व मान्यवर व सर्व खेळाडू
ऑलिंपिकवीर कुस्तीपटू कै.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करताना श्री शिवाजीराव घोरपडे, श्री बाबासाहेब गंगावणे , श्री व्ही जीं शिंदे,श्री महेश खुटाळे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि 15 ) :-
फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल मध्ये सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलेले ऑलिंपिकवीर कुस्तीपटू कै. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र क्रीडा दिनाचे औचित्य साधून मुधोजी हायस्कूलच्या सर्व खेळाडूंच्या समवेत कीडा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य मा. गंगवणे बी.एम, पर्यवेक्षक श्री व्हि.जी.शिंदे , ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री महेश खुटाळे, क्रीडा शिक्षक श्री बी.बी खुरंगे ,श्री जाधव डी एन, श्री नाना तांबे , कु. धनश्री क्षीरसागर , हॉकीचे वरिष्ठ खेळाडू होते.
कार्यक्रम प्रसंगी फलटण .एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे सचिव व मुधोजी हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ यांनी आज आपण महाराष्ट्र क्रीडा दिन का साजरा करतो याविषयी माहिती सांगितली तसेच 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून का साजरा करतो याबद्दल देखील सविस्तर माहिती सांगितली. तसेच शिवाजीराव घोरपडे यांची नात देविका घोरपडे ची 52 किलो वजन गटांमध्ये बॉक्सिंग या खेळासाठी महाराष्ट्र मधून एकमेव खेळाडूची ऑलिम्पिक पूर्व शिबिरामध्ये निवड झाली याचा देखील आवर्जून उल्लेख केला व ही आम्हा फलटणकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे यावेळी सांगितले तिची प्रेरणा घेऊन याही पुढे देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे खेळाडू फलटण नगरीत निर्माण व्हावेत असे प्रतिपादन यावेळी केले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र क्रीडा दिनाचे औचित्य साधून राज्य व राष्ट्रीय स्तरावर ज्या खेळाडूंनी सहभाग व पदक प्राप्त केले आहे अशा खेळाडूंचा देखील सत्कार घेण्यात आला यामध्ये हॉकी या खेळात 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या वेदिका वाघमोरे, सिद्धी केंजळे, गायत्री खरात, मानसी पवार तसेच 17 वर्षाखालील वयोगटामध्ये संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुराधा ठोंबरे, अनुष्का केंजळे, शिफा मुलांनी व सब् जूनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवलेल्या श्रेया चव्हाण, निकिता वेताळ, शिफा मुलांनी सत्कार घेण्यात आला. 19 वर्षाखालील वयोगटा मध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेली सिद्धी काटकर हिचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. नुकताच शिवाजी विद्यापीठ संघातून खेळून आलेला हॉकीचा भावेश रायते याचा देखील सत्कार करण्यात आला.
खो – खो या खेळामधून 14 वर्षाखालील गटात राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली संचिता गायकवाड तसेच कुमार कुमारी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेली, आरती भोसले ,श्रावणी साळुंखे, गीतांजली जाधव, व मयुरेश विटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच किक बॉक्सिंग या खेळामध्ये खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेली अंजली रोमन व कादंबरी मोरे, जान्हवी मर्दाने चा सत्कार करण्यात आला .
यावेळी श्री शिवाजीराव घोरपडे यांनी खाशाबा जाधव यांनी किती कठोर परिश्रम घेऊन व प्रतिकूल परिस्थिती असताना देखील 1952 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक मेडल कसे मिळवले याबद्दल सविस्तर माहिती सांगितली व अशा खेळाडूंचा आदर्श आपण नेहमीच डोळ्यासमोर ठेवून आपण खेळाडूंनी आपला नियमित सराव करावा असे नमूद केले.
या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य गंगवणे बी. एम., पर्यवेक्षक श्री व्हि.जी. शिंदे , ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री महेश खुटाळे या सर्वांनी महाराष्ट्र क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन मुधोजी हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री जाधव डी एन, कु. धनश्री क्षीरसागर , अविनाश गंगतीरे यांनी केले.आभार प्रदर्शन श्री खुरंगे बी.बी यांनी केले.