फलटण टुडे वृत्तसेवा (पणजी ): –
‘माईंडफुल एआय लॅब’ या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूचनाने चार वर्षांच्या चिमुरड्याचा खून करुन त्याचा मृतदेह बॅगेत टाकला आणि ती गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने निघाली होती. परंतु हॉटेल स्टाफला संशय आल्यानंतर चक्रं फिरली आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे राहणारी सूचना आपल्या मुलासह गोव्यातील एक हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. घटस्फोटित पतीसह मुलाची भेट होऊ नये, यासाठी सूचनाने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
सूचना सेठ गोव्यातील कँडोलिम येथील एका हॉटेलमध्ये आपल्या मुलासोबत राहत होती. हॉटेलमधून चेकआऊट करुन बाहेर पडत असताना तिचा चार वर्षांचा मुलगा तिच्यासोबत नव्हता. ती एकटी निघत असल्याचे पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला, त्यांनी विचारणा केली असता, मुलाला आधीच घरी पाठवल्याचा दावा तिने केला. सूचनाने हॉटेलमधून चेक आऊट केल्यानंतर कर्मचारी तिची खोली साफ करण्यासाठी गेले, तेव्हा तिथे त्यांना रक्ताचे डाग पाहून धक्काच बसला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.