*मुंबई खिलाडीसने पुन्हा एकदा राजस्थान वॉरियर्सवर केली मात* *ओडिशा जगरनॉट्सचा तेलगु योद्धासवर विजय*

गजानन शेंगाळ व रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार

फलटण टुडे (भुवनेश्वर, ७ जाने. ): –
अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई खिलाडीसने राजस्थान वॉरियर्सवर २ गुणांनी चुरशिच्या सामन्यात विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योद्धासवर ८ गुणांनी विजय मिळवला. हे सामने कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरु आहेत. आजच्या सामन्यामध्ये गजानन शेंगाळ व रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

आज झालेल्या पहिल्या व एकूण पंचवीसाव्या सामन्यात मुंबई खिलाडीसने पुन्हा एकदा राजस्थान वॉरियर्सचा २९-२७ (मध्यंतर १७-१२) असा दोन गुणांनी पराभव केला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व मुंबई खिलाडीसला आक्रमणासाठी आमंत्रित केले. सात मिनिटांच्या पहिल्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसने पहील्यांदाच पॉवर प्लेने सुरवात केली यात दोन वजीर घेऊन खेळू शकतो व वजीर कधीही कोणत्याही बाजूला जाऊ शकतो. राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीतील सतेज पाटीलला सुभासिस संत्राने सहज बाद केले, वृषभ वाघला एस. श्रीजेशने सहज बाद केले व विजय हजारेने ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले (एका तुकडीने तीन मिनिटे संरक्षण केल्यावर एक ड्रीम रन्सचा गुण मिळतो व त्यानंतर प्रत्येक ३० सेकंदानंतर एक ड्रीम रन्सचा गुण मिळतो) व तो अविक सिंघा कडून सहज स्पर्शाने बाद केले व हि तुकडी ४.१४ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील जगन्नाथ मुर्मूला गजानन शेंगाळने स्तंभात बाद केले. दिलराजसिंग सेंगरला एस. श्रीजेशने सहज स्पर्शाने बाद केले व मुंबईने १०-३ अशी अवघी ७ गुणांची आघाडी घेतली.

दुसऱ्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या खेळाडूंनी दमदार आक्रमण सुरु केले व मुंबई खिलाडीसच्या पहिल्या तुकडीतील प्रतिक देवारेला स्थानिक खेळाडू जगन्नाथ मुर्मूने आकाशीय सूर मारत बाद केले तर हृषिकेश मुर्चावडेला सुध्दा निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले, तर एम. शिबिन संरक्षण करताना मैदानाबाहेर गेल्याने बाद झाला. पावणे दोन मिनिटात पहिली तुकडी बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील गजानन शेंगाळला (१.४० मि, संरक्षण) निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले, पी. शिवा रेड्डीला जगन्नाथ मुर्मूने आकाशीय सूर मारत बाद केले व त्यापूर्वी त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. एस. श्रीजेशला (१.२९ मि, संरक्षण) प्रज्वल के एच ने सुध्दा आकाशीय सूर मारत बाद केले व त्यापूर्वी त्याने सुध्दा एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. तिसऱ्या तुकडीतील कोमलला मजहर जमादारने आकाशीय सूर मारत बाद केले व मध्यंतराला राजस्थान वॉरियर्सने मुंबई खिलाडीसवर १७-१२ अशी ५ गुणांची आघाडी घेतली.  

मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीतील सौरभ गाडगेला गजानन शेंगाळने आकाशीय सूर मारत बाद केले, सुशांत हजारेला हृषिकेश मुर्चावडेने सहज स्पर्शाने बाद केले. तर निलेश पाटीलला पी. शिवा रेड्डीने सहज बाद केले व हि तुकडी २.५३ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील रंजन शेट्टीने मिलिंद कुरपेने सहज बाद केले तर प्रज्वल के एच ला गजानन शेंगाळने आकाशीय सूर मारत बाद केले तर मजहर जमादारला एस. श्रीजेशने सहज स्पर्शाने बाद केले त्यावेळी सामन्याची वेळी ५.१३ मिनिटे झाली होती. तिसऱ्या तुकडीतील सतेज पाटीलला एस. श्रीजेशने सहज स्पर्शाने बाद केले व शेवटी विजय हजारे नाबाद राहिला. 

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने २६-१७ असे १० गुणांचे आव्हान राजस्थान वॉरियर्सला दिले व संरक्षणासाठी उतरले. त्यांच्या एमडी पाशा मैदानाबाहेर गेल्याने बाद झाला, अविक सिंघाला रंजन शेट्टीने आकाशीय सूर मारत बाद केले, गोविंद यादवला सुशांत हजारेने सहज बाद केले व हि तुकडी २.४१ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील खेळाडू मादानात आल्यावर राजस्थान वॉरियर्सने पॉवर प्ले घेतला. गजानन शेंगाळला मजहर जमादारने सहज बाद केले, एस. श्रीजेशला निलेश पाटीलने बाद सहज बाद केले पण त्यापूर्वी ३ ड्रीम रन्सचे गुण मिळवले व पी. शिवा रेड्डी नाबाद राहिला व राजस्थान जिंकत असलेला सामना मुंबईने संरक्षणाच्या जोरावर ३ ड्रीम रन्स मिळवल्याने २९-२७ असा दोन गुणांनी जिंकला. या सामन्यात एस. श्रीजेशला उत्कृष्ट आक्रमक, विजय हजारेला उत्कृष्ट संरक्षक तर गजानन शेंगाळला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आज झालेल्या दुसऱ्या व सव्वीसाव्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योद्धासवर ३५-२७ (मध्यंतर २३-१०) असा ८ गुणांनी विजय मिळवला. तेलगु योद्धासने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेतले व ओडिशा जगरनॉट्सला संरक्षणासाठी आमंत्रित केले. या सामन्यातील पहिल्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या दिलीप खांडवीला सौरभ आडवकरने सहज बाद केले, निखिल सोडयेला ध्रुवने सहज बाद केल मात्र त्यापूर्वी त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला, गौतम एम के ला राहुल मंडलने आकाशीय सूर मारत बाद केले व त्याने सुध्दा एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. हि तुकडी ३.३२ मिनिटाला बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील सुशांत काळधोणेला प्रतिक वाईकरने स्तंभात बाद केले, अविनाश देसाईला ध्रुवने आकाशीय सूर मारत बाद केले तर रोहन शिंगाडेने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून देत नाबाद राहिला व तेलगु योद्धासने १०-३ अशी ७ गुणांची नाममात्र आघाडी घेतली. 

दुसऱ्या टर्न मध्ये तेलगु योद्धासच्या पहिल्या तुकडीतील आदित्य गणपुलेला सहज स्पर्शाने व प्रतिक वाईकरला स्तंभात अविनाश देसाईने लागोपाठ बाद केले. अवधूत पाटीलला गौतम एम के ने सहज बाद केले व हि तुकडी १,३७ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील ध्रुवला दिलीप खांडवीने सहज बाद केले, राहुल मंडलला ओंकार सोनवणेने स्तंभात बाद केले तर आकाश तोगरेला रोहन शिंगाडेने आकाशीय सूर मारत बाद केले व हि तुकडी ३.२५ मिनिटात बाद झाली. तिसऱ्या तुकडीतील मिलिंद चावरेकरला दिलीप खांडवीने सहज बाद केले किरण वसावेला अविनाश देसाईने सहज बाद केले तर प्रसाद राडियेला ओंकार सोनवणेने आकाशीय सूर मारत बाद केले व हि तुकडी ६.११ मिनिटात बाद झाली व शेवटच्या तुकडीतील लिपुन मुखीला रोहन शिंगाडेने आकाशीय सूर मारत बाद केले व मध्यंतराला ओडिशा जगरनॉट्सने तेलगु योद्धासवर २३-१० अशी तब्बल १३ गुणांची आघाडी घेतली. 

मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये ओडिशा जगरनॉट्सच्या बी. निखीलला आदित्य गणपुलेने बाद केले, दिपेश मोरेला सौरभ आडवकरने आकाशीय सूर मारत बाद केले मात्र त्यापूर्वी त्याने २ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले तर ओंकार सोनवणेला प्रतिक वाईकरने सहज बाद केले व हि तुकडी ३.५७ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील मनोज कुमारला आदित्य गणपुलेने आकाशीय सूर मारत बाद केले, अक्षय मासाळला राहुल मंडलने स्तंभात तर मनोज पाटीलला सहज बाद केले व हि तुकडी ५.५७ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील निखिल सोडयेला अरुण गुणकीने आकाशीय सूर मारत बाद केले व त्यावेळी गुणफलकावर ओडिशा जगरनॉट्सने २५-२४ असे गुण नोंदवले व विजयाकडे जोरदार मुसंडी मारली.     

शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलगु योद्धासच्या पहिल्या तुकडीतील प्रतिक वाईकरला गौतमने आकाशीय सूर मारत बाद केले, आदित्य गणपुलेला मनोज कुमारने सहज बाद केले तर अवधूत पाटीलला दिलीप खांडवीने आकाशीय सूर मारत बाद केले मात्र त्यापूर्वी त्याने ३ ड्रीम रन्स मिळवून दिले व हि तुकडी ४.२४ मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील ध्रुवला ओंकार सोनवणेने व आकाश तोगरेला बी. निखीलने सहज स्पर्शाने बाद केले व हा सामना ३५-२७ असा ८ गुणांनी जिंकला. या सामन्यात दिलीप खांडवीला उत्कृष्ट आक्रमक, अवधूत पाटीलला उत्कृष्ट संरक्षक तर रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.    

सोमवारी पहिला सामना तेलगू योद्धास व गुजरात जायंट्स यांच्यात तर दुसरा सामना चेन्नई क्विक गन्स व राजस्थान वॉरियर्स यांच्यात रंगेल. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!