अमरहिंद मंडळ आयोजित आंतरशालेय लंगडी स्पर्धा

मुलांमध्ये श्री गणेश हायस्कूल वडाळा, तर मुलींमध्ये सरस्वती मंदिर हायस्कूल माहीम विजयी
फलटण टुडे (मुंबई, ४ जाने. (क्री. प्र.), दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे आंतरशालेय लंगडी स्पर्धा अमरहिंद मंडळाने आयोजित केली होती. लंगडीचा राष्ट्रीय खेळाडू श्री. निरव पाटील याच्या हस्ते लंगडी स्पर्धेचे उदघाटन पार पाडले. त्यावेळी मंडळाचे खजिनदार श्री. प्रफुल्ल पाटील, सदस्य रमेश नाटेकर, निलेश सावंत, रोहन चव्हाण आदि उपस्थित होते.

या स्पर्धेत मुलांमध्ये श्री गणेश शाळा मराठी माध्यम वडाळा, एस व्ही एस हायस्कूल, वरळी, आर्यन हायस्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर, श्री गणेश शाळा इंग्रजी माध्यम वडाळा, श्री गौरी दत्त मित्तल सायन, चिकित्सक समूह गिरगाव, सरस्वती मंदिर हायस्कूल माहीम, सोशल सर्विस लीग हायस्कूल परेल यांनी तर मुलींमध्ये श्री गणेश शाळा मराठी माध्यम वडाळा, एस व्ही एस हायस्कूल वरळी, मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर, श्री गणेश शाळा इंग्रजी माध्यम वडाळा, श्री गौरी दत्त मित्तल सायन, सरस्वती मंदिर हायस्कूल माहीम, सोशल सर्विस लीग हायस्कूल परेल या शाळांनी भाग घेतला होता.   

मुलांच्या अंतिम सामन्यात लंगडी मध्ये सध्या आघाडीवर असणाऱ्या वडाळ्याच्या श्री गणेश हायस्कूलने गिरगावच्या चिकित्सक समूह हायस्कूलचा २४-२१ (मध्यंतर २४-०९) असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात गौरव काप (१ मि. संरक्षण व ५ गुण), प्रणय झोरे (नाबाद १ मि संरक्षण व २ गुण), अर्जुन पाटील व दर्शील जाधव (प्रत्येकी ४-४ गुण) व अल्पेश गीते (३ गुण) यांनी लंगडी घालताना व संरक्षण करताना अतिशय सुंदर कामगिरी केली व त्याच जोरावर श्री गणेश हायस्कूलने चिकित्सक समूह हायस्कूलचा जोरदार धुव्वा उडवला. तर अंतिम पराभूत चिकित्सक समूह हायस्कूलच्या श्रेयस बेटकर, आदर्श मोहिते (प्रत्येकी ४-४ गुण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्यांना इतर खेळाडूंकडून हवीतशी साथ न मिळाल्याने चिकित्सकला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

मुलींच्या अंतिम सामन्यात लंगडी मध्ये दोन्ही तुल्यबळ असणाऱ्या संघात सामना झाला. या सामन्यात माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलने वडाळ्याच्या श्री गणेश हायस्कूलचा १८-१७ असा अतिशय अटीतटीच्या सामन्यात एक गुणाने निसटता पराभव केला. सरस्वती मंदिर हायस्कूलच्या जान्हवी लोंढे (१.४०, २ मि. संरक्षण व १० गुण), रिया सिंग (२.१० मि. संरक्षण व २ गुण), हर्षला सकपाळ (१.४० मि. संरक्षण व १ गुण), अवनी पाटील (१.१० मि. संरक्षण) यांनी केलेल्या कमालीच्या खेळाच्या जोरावर सरस्वती मंदिर हायस्कूलला विजय मिळू शकला. तर पराभूत गणेश हायस्कूलच्या रेहा पोष्टुरे (१.३०, १.५० मि. संरक्षण व ५ गुण), दक्षता तांडेल (१, १ मि. संरक्षण), प्रसिद्धी ठाकूर (नाबाद १.२० मि. संरक्षण व २ गुण) व श्रुती भूरवणे (३ गुण) यांची कडवी लढत शेवटी अपुरी ठरली व श्री गणेश हायस्कूलला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.  

उपांत्य फेरीत मुलांमध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल दादर व सोशल सर्विस लीग हायस्कूल परेल या शाळा पराभूत झाल्या तर मुलींमध्ये सोशल सर्विस लीग हायस्कूल परेल व श्री गौरी दत्त मित्तल सायन या शाळा पराभूत झाल्या. बक्षीस समारंभास साई इलेक्ट्रिकल्सचे मालक आदित्य गंधेकर व अमर हिंद मंडळाचे पदाधिकारी व लंगडी खेळ प्रेमी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!