*गुणतालिकेत मिळवले पहिले स्थान*
रामजी कश्यप व निलेश पाटीलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
फलटण टुडे (भुवनेश्वर, १ जाने ).: –
आज झालेल्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवत ६ गुणांनी व्ज्या साजरा करत गुणतालिकेत १४ गुणानंसह पहिले स्थान मिळवले. तर दुसऱ्या सामन्यात तेलुगू योद्धाने राजस्थान वॉरियर्सचा ७ गुणांनी मोठा पराभव केला. हे सामने अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाले. आजच्या सामन्यामध्ये रामजी कश्यप व निलेश पाटीलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज झालेल्या पंधराव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने गुजरात जायंट्सचा ३५-२९ (मध्यंतर १०-१७) असा ६ गुणाने धुव्वा उडवला. गुजरातला मध्यंतराला मिळालेल्या ७ गुणाची आघाडी कामी आली नाही. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व गुजरात जायंट्सला आक्रमणासाठी आमंत्रित केले. पहिल्या टर्नमध्ये लक्ष्मण गवसला आकाशीय सूर मारत पी नरसय्याने बाद केले. तर अभिनंदन पाटीलने सुमन बर्मनला सहज स्पर्शाने बाद केले व पहिली तुकडी पावनेदोन मिनिटाच्या आत बाद झाली. दुसरी तुकडीने जवळजवळ साडेतीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत संघाला दोन गुण मिळवून दिले. फैजंखा पठाणने विजय शिंदेला लवकर बबड केले मात्र रामजी कश्यपने ड्रीम रन्सचे २ गुण मिळवून दिले व तो व्ही सुब्रमणि कडून सहज स्पर्शाने बाद केले. तर भरत कुमारने आकाशीय सूर मारत मदनाला बाद केले. त्यानंतर राजवर्धन पाटीलने आकाशीय सूर मारत आदर्श मोहितेला बाद केले.
दुसऱ्या टर्न मध्ये पहिल्या तुकडीने साडेतीन मिनिटाच्या वर संरक्षण करत दोन गुण आपल्या संघासाठी वसूल केले. चेन्नई क्विक गन्सच्या सुरज लांडेने शुभम थोरातला (१.५३ मि. संरक्षण) सहज स्पर्शाने बाद केले त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत दीपक माधवला बाद केले तर रामजी कश्यपनेच दुसरा आकाशीय सूर मारत फैजंखा पठाणला बाद केले मात्र बाद होण्यापूर्वी त्याने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. त्यानंतर रामजी कश्यपनेच सुयश गरगटेला बाद केले. त्यावेळी गुजरात जायंट्सने चेन्नई क्विक गन्सवर १७-१० अशी ७ गुणांची आघाडी घेतली.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी गुजरात जायंट्सत्यने सव्वा मिनिटात बाद झाली मात्र त्यानंतर आलेल्या विजय शिंदेने २.२३ मि. संरक्षण केले व त्याला राजवर्धन पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले. त्यानंतर फैजंखा पठाणने मदनाला लवकर बाद केले. यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत रामजी कश्यपने ५ ड्रीम रन्सचे गुण मिळवून संघाला एक मजबूत स्थितीत आणले. एका तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त संरक्षण केल्यानंतर एक ड्रीम रणचा गुण मिळतो व त्यनंतर प्रत्येक ३० सेकंदानंतर एक ड्रीम रणचा गुण मिळतो. शेवटी रामजी कश्यपने ४.३८ मिनिटे संरक्षण करत सामन्याला कलाटणी मिळवून देण्यात मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत ५ ड्रीम रन्सचे गुण मिळवून देणारा रामजी कश्यप हा एकमेव खेळाडू ठरला.
शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सने १५-२९ च्या पिछाडीनंतर २० गुण मिळवत संघाला विजय मिळवून दिला. या टर्न मध्ये चेन्नईने गुजरातच्या संघातले १० खेळाडू बाद करत २० गुण मिळवून अल्टीमेट खो-खो सीझन २ मध्ये आत्तापर्यंत अजिंक्य असलेल्या गुजरात जायंट्सचा ३५-२९ असा सहा गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजवर्धन पाटीलला उत्कृष्ट आक्रमक, विजय शिंदेला उत्कृष्ट संरक्षक तर रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आजचा दुसरा व एकूण सोळावा सामना राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धास यांच्यात झाला. तेलुगू योद्धाने राजस्थान वॉरियर्सवर ३४-२७ (मध्यंतर १७-१२) असा ७ गुणांनी मोठा पराभव केला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व तेलुगू योद्धासला आक्रमणासाठी आमंत्रित केले. या सामन्यात पहिल्या टर्न मध्ये राजस्थान वॉरियर्सच्या पहिल्या तुकडीने साडेतीन मिनिटांपेक्षा पेक्षा जास्त वेळ संरक्षण करत २ ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले. वजय हजारेला प्रतिक वाईकरने बाद केले तर ऋषभ वाघने १,५१ मि. संरक्षण करताना दोन ड्रीम रन्सचे दोन गुण मिळवले त्याला राहुल मंडलेने सहज स्पर्शाने बाद केले. त्यानंतर राहुल मंडलेने जगन्नाथ मुर्मूला स्तंभात बाद केले. लगेचच आदित्य गणपुलेने दिलराजसिंग सेंगरला बाद केले तर प्रतिक वाईकरने आकाशीय सूर मारत डी. नंदनला बाद केले. तर शेवटी लिपुन मुखीने सुध्दा आकाशीय सूर मारत निलेश पाटीलला बाद केले.
दुसऱ्या टर्न मध्ये राजस्थानने आक्रमण करत १२ गुण मिळवले तर तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला. त्यांच्या प्रतिक वाईकरला निलेश पाटीलने स्तंभात बाद केले. आदित्य गणपुलेला आकाशीय सूर मारत सुशांत हजारेने बाद केले तर अवधूत पाटीलने एक ड्रीम रन्सचा गुण मिळवून दिला मात्र त्याला निलेश पाटीलने स्तंभात बाद करून पहिल्या तुकडीला परत पाठविले. ध्रुवने १.१८ मि. संरक्षण केले मात्र त्याला प्रज्वलने बाद केले. आकाश तोगरेने दोन ड्रीम रन्सचे गुण मिळवून दिले व त्याला बी. राजूने बाद केले.
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासने आक्रमण करताना ३३ गुण मिळवत राजस्थान वॉरियर्सला तगडे आव्हान दिले. राजस्थानची पहिली तुकडी लवकर बाद झाल्याने त्यांच्या गोठत चिंतेचे वातावरण पसरले. दुसरी तुकडी सुध्दा विशेष काही करू न शकल्त्याने तेलुगू योद्धासचे पारडे भारी पडताना दिसले. प्रतिक वाईकर व आदित्य गणपुलेने प्रत्येकी ४-४ गुण मिळवले तर सौरभ घाडगेने नाबाद राहत व ड्रीम रन्सचा एक गुण मिळवून दिला.
शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासने विजयासाठी राजस्थानला २० गुणांचे आव्हान ठेवले. तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण केल्याने त्यांना एक ड्रीम रन्सचा गुण मिळवला. तेलुगू योद्धासच्या वृषभ वाघने विजयभाई वेगडला बाद केले, प्रसाद राडीयेने एक ड्रीम रन्स मिळवून दिला व त्याला निलेश पाटीलने आकाशीय सूर मारतबाद केले. दुसरी तुकडी लवकर बाद झाली मात्र त्याचा फायदा राजस्थानला उचल्या आला नाही. व शेवटी प्रतिक वाईकरला निलेश पाटीलने आकाशीय सूर मारत बाद केले. मात्र राजस्थान वॉरियर्सला फक्त २७ गुणच मिळवता आल्याने त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रतिक वाईकरला (८ गुण) उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर निलेश पाटीलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मंगळवारी पहिला सामना चेन्नई क्विक गन्स व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात तर दुसरा सामना मुंबई खिलाडीस व गुजरात जायंट्स यांच्यात रंगेल. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी अल्टीमेट खो खो स्पर्धा सुरु केली असून हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील.