फलटण टुडे ( मुंबई, ता. 24 डिसेंबर ): –
ओडीसा येथे सुरू होत असलेल्या अल्टीमेट खो-खो लीगच्या सीझन दोन साठी तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून भातीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कटक येथे 24 डिसेंबर ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत हि स्पर्धा होत आहे. महाराष्ट्रासाठी ही महत्वाची व अभिमानाची बातमी आहे. याबरोबरच महाराष्ट्रामधून पंच प्रमुख काका पाटणकर, पुण्याचे नाना झांबरे, ठाण्याचे किशोर पाटील हे अल्टीमेट खो-खो स्पर्धेसाठी पंच व अधिकारी म्हणून निवडले गेले आहेत.
खो-खो या देशी खेळाला व्यावसायीक स्वरुप देण्यासाठी खो-खो फेडरेशनच्या माध्यमातुन गतवर्षीपासून अल्टीमेट खो-खोचा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाला असून दुसर्या वर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळावा यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी गव्हर्निंग कौन्सिल, इथिक्स अँड गव्हर्नन्स कमिटी आणि तांत्रिक कमिटी तयार केली आहे. त्याद्वारे स्पर्धेची नियमावली बनविण्यात येते. राष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळाडू सहभागी झाले आहे. स्पर्धेचा दर्जा टिकवून ठेवतानाच तळागाळातील प्रेकक्षांपर्यंत खेळ पोचवण्याच्यादृष्टीने स्पर्धेच्या समित्यांना महत्व आहे. डॉ. चंद्रजित जाधव यांची तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी निवड ही अत्यंत महत्वाच्या पदावर झाली आहे. याबाबत डॉ. जाधव म्हणाले, राष्ट्रीयस्तरावर या स्पर्धेत देशभरातील गुणवान खेळाडू आपल्या खेळाची चमक दाखवतात. या निमित्ताने खो-खो घराघरात पोचला आहे. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावरही लोकप्रियता मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत.