फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे दि 23 ) : –
“लोहियानगर परिसरातील महात्मा फुले वाडा स्मारक व सावित्रीबाई फुले स्मारक ही दोन्ही ऐतिहासिक ठिकाणे एकमेकांना जोडून विस्तृत स्वरूपाचे व जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्याचे सरकारचे नियोजन आहे.
स्मारक करताना घरे बाधित होणार आहेत, त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करून स्थानिक नागरिकांना चांगले रस्ते दिले जातील, स्मारकाच्या कामाचा कोणालाही त्रास होणार नाही, यादृष्टीने महापालिका व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतलेली भिडेवाड्याची जागा आणि लोहियानगर येथील महात्मा फुले वाडा स्मारक व सावित्रीबाई फुले स्मारकाची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी सकाळी सहा वाजता केली.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, “सावित्रीबाई फुले स्मारकाच्या ठिकाणी सभागृह आहे. त्याच अनेक वर्ष झाले असून बरेच बदलही होत गेले आहेत. त्यामुळे महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक ही दोन्ही ठिकाणे एकमेकांना जोडून जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचे सरकारने ठरविले आहे. मात्र हे काम करताना काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार आहे.
संबंधित कुटुंबांचा त्यास विरोध नाही, मात्र आम्हाला वाऱ्यावर सोडू नका आणि जवळच पुनर्वसन करा, अशी त्यांची मागणी आहे. घरमालकांचे समाधान केले जाईल, भाडेकरूंचीही पर्यायी व्यवस्था केली जाईल. कोणालाही त्रास होणार नाही.
दोन्ही ठिकाणे एकमेकांना जोडल्यास पावणे चार एकर जागा होईल, ५३ गुंठे नवीन जागा घ्यावी लागणार आहे. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. स्मारक जोडल्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. सगळ्यांचा विचार करून महापालिका व सरकार मार्ग काढणार आहे.
सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही जागा पावणे तीन गुंठे आहे. महापालिकेने तिथे चौदा मजले इतकी उंच वास्तु उभी करण्याचे नियोजन केले आहे. मात्र चौदा मजले उंचीची रचना योग्य होणार नाही.
वास्तु उंच असण्यापेक्षा रुंद असल्यास उपयुक्त ठरेल. संबंधित वास्तू बाहेरून ऐतिहासिक वाटली पाहिजे. तेथे शाळा सुरू केल्यास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याचा विचार केला जाईल. त्यासाठी भिडेवाड्यामागील जागेची पाहणी केली जात आहे. शंभर वर्षांपूर्वी जिथे शाळा भरत होती, त्याची आठवण पुढच्या पिढ्यांना राहिली पाहिजे, यादृष्टीने तेथे शाळा असणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.